13 November 2019

News Flash

महाराष्ट्रातील बँका आजही बंदच

विविध १० सार्वजनिक बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : महाराष्ट्रातील व्यापारी बँका मंगळवारीदेखील बंदच राहणार आहेत. राज्यातील बँका सलग तिसऱ्या दिवशी बंद राहणार असल्याने खातेदार, ठेवीदार, ग्राहकांचे हाल कायम आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरण विरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारच्या, २२ ऑक्टोबर रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून व्यापारी बँकांच्या घसरत्या ठेवी दरांविरोधातही तीव्र मत प्रदर्शित केले जाणार आहे.

रविवारच्या सुटीला विधानसभेसाठीच्या मतदानाची सुटी लागू झाल्याने महाराष्ट्रात मात्र सलग तिसऱ्या दिवशी व्यापारी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ आणि ‘बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया’ने मंगळवारच्या संपाची हाक दिली असून विविध १० ते १२ कर्मचारी, अधिकारी संघटना आंदोलनात सहभागी होत आहेत.

रिझव्‍‌र्ह बँक, स्टेट बँक तसेच क्षेत्रीय ग्रामीण बँका तसेच खासगी व सहकारी बँकांचे कर्मचारी, अधिकारी मंगळवारच्या संपात सहभागी होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध १० सार्वजनिक बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. १ एप्रिल २०२० पासून त्याची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने होण्याची शक्यता आहे.

विलिनीकरणाविरोधात संघटनांनी गेल्या महिन्यातही संपाची घोषणा केली होती. मात्र लागून येणाऱ्या सुटीच्या पाश्र्वभूमीवर संपामुळे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून तो बँक व्यवस्थापनाच्या आवाहनानंतर मागे घेण्यात आला होता.

First Published on October 22, 2019 12:22 am

Web Title: banks in maharashtra remain closed today due to strike zws 70