News Flash

सरकारच्या धोरणात्मक सक्रियतेने ‘सेन्सेक्स’मध्ये त्रिशतकी झेप

गुंतवणूकदारांनी शेवटच्या तासा-दीड तासात केलेल्या मोठय़ा प्रमाणातील खरेदीमुळे

मंगळवारी जाहीर झालेला वस्तू व सेवा कर कायद्याचा मसुदा, तसेच बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने बँक, नागरी हवाई सेवा क्षेत्राकरिता घेतलेले धोरणात्मक निर्णय या जोरावर भांडवली बाजाराने गेल्या पाच दिवसांतील मरगळ झटकून तेजी नोंदविली. त्रिशतकी वाढीने सेन्सेक्सही त्याच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या तळातून बाहेर पडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही बुधवारी ८,२०० चा टप्पा सहज पार करता झाला.

गुंतवणूकदारांनी शेवटच्या तासा-दीड तासात केलेल्या मोठय़ा प्रमाणातील खरेदीमुळे सेन्सेक्सने ३३०.६३ अंश वाढ नोंदवीत २६,७२६.३४ पर्यंत मजल मारली. तर जवळपास शतकी – ९७.७५ अंश वाढीने निफ्टी ८,२०६.६० वर पोहोचला. गेल्या सलग चार व्यवहारात सेन्सेक्सने ६२५ अंशांचे नुकसान नोंदविले होते. आठवडय़ापासून तळात जाणाऱ्या डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा बुधवारच्या सत्रातील उठावही बाजाराच्या तेजीला एक निमित्त ठरला.

वस्तू व सेवा कर कायद्याचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर त्याचा आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनातील मंजुरीचा मार्ग मोकळा दिसत असल्याचे चित्र बाजारात उमटले. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत पाच सहयोगी बँकांचे मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरण व नागरी हवाई क्षेत्रासाठीचे नवे धोरण यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर बाजारात त्याचे तेजीच्या रूपात स्वागत केले गेले.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदराबाबतच्या बैठकीची फलश्रुती बुधवारी उशिरा होणार आहे. या जोरावर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण होतेच. येथील मुंबई निर्देशांक सकाळच्या व्यवहारातच २६,५०० चा स्तर पार करता झाला. दुपारच्या व्यवहारापर्यंत त्याने २६,७५२.५९ पर्यंत मजल मारली. याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ८,२१३.२० वर पोहोचला होता.
सेन्सेक्समध्ये अन्य वाढलेल्या कंपन्यांमध्ये एनटीपीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, बजाज ऑटो, गेल, टाटा स्टील, सिप्ला, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भेल, हिंदुस्थान यूनिलिव्हर आदींचा क्रम राहिला. त्यांचे मूल्य थेट ३.८८ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांत भांडवली वस्तू, ऊर्जा, सार्वजनिक उपक्रम, बँक, पायाभूत सेवा, तेल व वायू आदी तेजीत वरच्या स्थानावर राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही एक टक्क्यापर्यंत वाढले.

3

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2016 7:48 am

Web Title: banks lift sensex 331pts nifty above 8200 ahead of fed decision
टॅग : Loksatta,Nifty,Sensex
Next Stories
1 सूक्ष्म वित्त बँकांना परवाने मंजुरीत कथित घोटाळा
2 बँक ऑफ महाराष्ट्रला ‘स्कॉच’ पुरस्कार
3 ‘हुडको’च्या १० टक्के हिस्साविक्रीचा निर्णय
Just Now!
X