कर्मचारी, अधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवारी (८ जानेवारी) देशव्यापी संपाची हाक दिल्याने बँकांचे कामकाज सलग तीन दिवस विस्कळीत होणार आहे. संपाला लागून आलेल्या शनिवार (महिन्यातील दुसरा शनिवार म्हणून) व रविवारमुळे येत्या आठवडय़ात तीन दिवस खातेदार/ग्राहकांच्या सेवांवर परिणाम होणार आहे.
‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ (एआयबीईए)ने स्टेट बँकेच्या सहयागी पाच बँकांच्या मुख्य बँकेतील विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी या संपाची हाक दिली आहे. स्टेट बँक ही स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर व स्टेट बँक ऑफ पटियाळा या तिच्या पाच सहयोगी बँकांमध्ये एकतर्फी सेवाशर्ती लादत असल्याचे निमित्त या आंदोलनासाठी देण्यात आले आहे. अशा सेवा शर्ती बँका विलीन करून घेण्यापूर्वी लागू करणे हे बँक कर्मचारी संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ व बँक व्यवस्थापनाची संघटना असलेल्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ यांच्या दरम्यान झालेल्या कराराचे उल्लंघन असल्याचा दावाही संपकरी नेतृत्वाने केला आहे.
एक दिवसाच्या या संपात पाच लाख कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार असून या संपात सहकारी बँका आणि ग्रामीण बँका यांचा समावेश नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.