: रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरांमध्ये फेरबदल केले नसले तरी अर्थव्यवस्थेच्या उभारीबाबत आशावादी सूर, पुरेशी रोकडसुलभता राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे भांडवली बाजाराने शुक्रवारी स्वागत केले. मुख्यत: व्याजदराबाबत संवेदनशील असणाऱ्या बँका, वित्तीय सेवा आणि स्थावर मालमत्ता समभागांमध्ये खरेदीमुळे दिसलेली मूल्य तेजी हे सप्ताहअखेरच्या व्यवहाराचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

प्रमुख निर्देशांकाने ‘सेन्सेक्स’ने सात्यत्य कायम राखत शुक्रवारी ३२६.८२ अंशांची ताजी भर घालून ४०,५०९.४९ ही पातळी गाठली. सलग सातव्या दिवशी सुरू राहिलेली ही सेन्सेक्सची चालू वर्षांतील सर्वात दीर्घ काळ सुरू राहिलेली दौडही ठरली. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने ७९.६० अंश कमावत, १२ हजारांसमीप ११,९१४.२० या पातळीवर दिवसअखेर मजल मारली.  ‘सेन्सेक्स’मधील ३० समभागांपैकी सर्वाधिक वाढ नोंदविणाऱ्या समभागांत गृहवित्त क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी लिमिटेडने ३ टक्क्य़ांची मूल्य वाढ राखून आघाडी घेतली.