वेतनवाढीची चर्चा अध्र्या टक्क्याच्या पुढे न जाऊ शकल्याने बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. ऐन केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तोंडावर १० लाख बँक कर्मचारी सलग चार दिवसांच्या संपावर जाणार आहेत. २५ ते २८ फेब्रुवारी असा चार दिवस सलग संप केल्यानंतर ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या नेतृत्वाखाली येत्या १६ मार्च रोजी बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ची (यूएफबीयू) मंगळवारी बँक व्यवस्थापन संघटना ‘इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए)’बरोबर चर्चा झाली. संघटनेने यापूर्वीचा आपला २३ टक्के वेतनवाढीचा आग्रह १९.५ टक्क्यांवर आणला, तर ११ टक्क्यांपासून सुरुवात करणाऱ्या बँक व्यवस्थापनाने १३ टक्के वेतनवाढीची तयारी दर्शविली.