बँक कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे ऐन आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्पाच्या दिवशीही बँका बंद होत्या. विविध मागण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. मात्र, त्यानंतरही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं कर्मचारी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बँक कर्मचारी तीन दिवसांचा संप पुकारू शकतात. ११ मार्च ते १३ मार्चदरम्यान कर्मचाऱ्यांनी संपाचा कालावधी निवडला आहे. १४ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १५ मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाच दिवस बँकांची दारे बंद राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकते. एटीएममध्ये पैशांचा तुडवडा पडू शकतो. त्यामुळे शक्यतो सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बँकेची सर्व कामे पूर्ण करावीत.
बँक कर्मचारी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक कर्मचारी संघटना (AIBEA) यांच्याकडून संपाला दुजारा देण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सर्व राष्ट्रीयकृत बँकातील कर्मचाऱ्यांकडून ११ मार्च ते १३ मार्च २०२० दरम्यान संप पुकारण्यात येईल.
काय आहेत मागण्या ?
आपल्या अनेक मागण्यांसाठी इंडियन बँक असोसिएशनकडून संपाची हाक देण्यात आली. त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. कामाचं समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन, पाच दिवसांचा आठवडा अशा मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 12:58 pm