देशभरातील संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत धनादेश वटणावळीत सामायिकता आणणारी ‘चेक ट्रंकेशन सिस्टीम (सीटीएस २०१०)’ प्रणाली सर्व प्रकारच्या बँकांनी ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत अंमलात आणावयाची असून, त्यायोगे सध्या वापरात असलेले धनादेश रद्दबातल ठरून त्याजागी नव्या ‘सीटीएस’ प्रणालीनुसार रचना केले गेलेले धनादेश बँकांना ग्राहकांना द्यावे लागतील.
धनादेश वटणावळ ही बँकिंग प्रणालीतील सर्वात क्लिष्ट आणि वेळकाढू प्रकिया ठरली आहे. बँकांकडे दररोज धनादेशकर्त्यांकडून मोठय़ा संख्येने जमा होणाऱ्या धनादेशांचा प्रत्यक्ष स्वरूपात ज्या बँकेचा धनादेश आहे त्या बँकेच्या इच्छित शाखेपर्यंतचा प्रवास आजवरच्या प्रक्रियेत आवश्यक ठरत असे. पण ही प्रक्रिया वेगवान बनविण्यासाठी अदाकर्ता बँकेकडून त्या धनादेशाची इलेक्ट्रॉनिक अथवा स्कॅन केलेली प्रतिमा संबंधित क्लिअरिंग हाऊसकडे पोहचविली तरी चालण्यासारखे आहे. अर्थात त्या सोबत प्रस्तुतकर्ता बँक, एमआयसीआर बँड (नेमकी शाखा दर्शविणारा) आणि धनादेश जारी केल्याची तारीख हा तपशीलही असेल. यातून जुन्या प्रक्रियेतील प्रत्यक्ष धनादेशाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या प्रवासासाठी लागणारा खर्चही वाचेल. शिवाया एकंदर प्रक्रिया सुटसुटीत आणि सफाईदार बनेलच, पण सुरक्षितता आणि वेळेच्या दृष्टीनेही ती महत्त्वपूर्ण ठरेल.
दक्षता आवश्यक ठरेल :
नव्या ‘सीटीएस’ प्रणालीतील धनादेश लिहून देताना ग्राहकांना दक्षता घ्यावी लागेल. प्राप्तकर्त्यांचे नाव, रक्कम शब्दांमध्ये तसेच अंकात लिहिताना कसलीही खाडाखोड व फेरबदल केले गेल्यास हा धनादेश अमान्य ठरेल. आजवरच्या प्रचलित पद्धतीने जेथे फेरफार केला त्या ठिकाणी सही केली जायची. हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. आवश्यक तो फेरफार करायचा झालाच तर नवीन धनादेशच खातेदाराला देणे भाग पडेल. धनादेशांचा प्रवास हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार असल्याने स्कॅनरकडून वाचला जाईल असा धनादेशावरील मजकूर गडद शाई असलेल्या पेनाने लिहिलेला असायला हवा.     

ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही!
१ जानेवारी २०१३ पासून केवळ नवीन सीटीएस प्रणालीनुसार अद्ययावत धनादेश सर्व बँकांकडून स्वीकारले जाण्याचे रिझव्र्ह बँकेने आदेश दिले असले तरी बँकिंग व्यवस्थेत जमा होणारे जुने धनादेश तडक नापास केले जातील असे नाही, ही बाब रिझव्र्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच स्पष्ट केली. या संबंधीच्या खुलासेवजा सूचना डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात एकूण  नव्या प्रणालीकडील स्थित्यंतराचा अंदाज घेऊन रिझव्र्ह बँकेकडून बँकांना दिल्या जातील, असेही या सूत्राने सांगितले. अनेक बँकांमध्ये विशेषत: ग्रामीण बँका तसेच सहकारी बँकांमध्ये नव्या धनादेश प्रणालीकडील संक्रमण पूर्ण होण्याला काहीसा कालावधी द्यावा लागेल, याची दखल घेताना रिझव्र्ह बँकेकडून योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे या अधिकाऱ्याने सूचित केले.
* बँकिंग प्रणालीत जमा होणाऱ्या धनादेशांची संख्या : ६० लाख
* धनादेशांद्वारे दैनंदिन उलाढाल होणारी रक्कम : ५०,००० कोटी रु.
* ऑगस्ट २०१२ या एका महिन्यात वठणावळ झालेले धनादेश : १.०७ कोटी
* ऑगस्टमध्ये धनादेशांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे पाय फुटलेली रक्कम :७,८१,३०० कोटी रु.
(स्रोत : भारतीय रिझव्र्ह बँक)

काय  काळजी घ्याल?
1)गेल्या महिना-दीड महिन्यात बँकेकडून नवीन मिळविलेल्या धनादेश-पुस्तिकेत वर दिलेली ‘सीटीएस’ प्रणालीतील सामायिक वैशिष्टय़े आहेत काय, हे तपासून घ्या.
2)जर तुमच्यापाशी असलेले धनादेश जुन्या धाटणीचे असतील, तर ते ३१ डिसेंबरपूर्वी नव्या प्रणालीनुसार अद्ययावत करून घ्या.
3) गृहकर्जाच्या परतफेडीचे हप्ते इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग (ईसीएस) प्रणालीनुसार जात नसतील तर मासिक हप्त्यांदाखल दिलेले उत्तरतिथीय (पोस्ट डेटेड) धनादेशदेखील ग्राहकांनी नव्या प्रणालीनुसार बदलावेत.
4) पुढचा मनस्ताप टाळण्यासाठी, ग्राहकांनी स्वीकारलेले जुन्या धाटणीचे धनादेश कोणतीही दिरंगाई न करता लवकरात लवकर वठविले जातील याची दक्षता घ्यावी.