डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यनाला आळा घालण्यासाठी रिझव्र्ह बँकेने सोमवारी उशिरा वाणिज्य बँकांसाठी योजलेल्या उपायांमुळे बँकांकडून व्याजदरात वाढीचा परिणाम संभवणार नाही अथवा रिझव्र्ह बँकेच्या व्याजदरात टप्प्याटप्प्याने नरमाई आणण्याच्या धोरणातही बदल संभवत नाही, असा निर्वाळा अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिला.
रुपयाला सावरण्यासाठी रिझव्र्ह बँकेने जाहीर केलेले उपाय इच्छित परिणाम साधतील असा विश्वास व्यक्त करीत अर्थमंत्र्यांनी त्यांच्यात व रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्यात परस्पर विसंवाद नसल्याचेही अप्रत्यक्षपणे सूचित केले. सोमवारी नवी दिल्ली अर्थमंत्री, पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी उशिरा रिझव्र्ह बँकेने तीन उपाययोजनांची घोषणा केली आहे.
रिझव्र्ह बँकेकडून जुलैअखेरीस पतधोरण जाहीर होणार आहे. सध्याचे उपाय हे रुपयातील अतिरिक्त सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी आणि त्याला डॉलर व युरो या प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत स्थिरता प्रदान करण्यासाठी आहेत. महिनाअखेर जाहीर होत असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणाशी त्यांचा काही एक संबंध नसल्याचे चिदम्बरम यांनी स्पष्ट केले.
* रुपयाच्या निश्चितीबाबत
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर निश्चित करण्याबाबतची शक्यताही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. चलनाचा दर हा पूर्णत: आपण विदेशी चलन किती कमावतो व आपण ते किती खर्च करतो, यावर निर्भर आहे, असे स्पष्ट केले.
* वित्तीय तुटीबाबत
देशाची वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.८ टक्के राखणे हे अद्यापही सरकारचे उद्दिष्ट असल्याचे चिदम्बरम यांनी म्हटले आहे. तीदेखील धोक्याची पातळी आहे, त्यावर आपण पोहोचणार नाही, असे नमूद करत गेल्या काही वर्षांत तूट ३ टक्क्याच्या आत राहिली आहे, असेही ते म्हणाले.
* सोने आयातीबाबत
मौल्यवान धातू सोन्याच्या आयातीवर संपूर्ण बंदीची शक्यता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावली. सोन्याबद्दल भारतीय खरेदीदारांचे अनोखे भावबंध आहेत, तेव्हा सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी करता येईल इतकेच पाहायला हवे, असेही ते म्हणाले.