News Flash

बीएएसएफद्वारे मुंबईत आशियातील सर्वात मोठे नाविन्यता केंद्र

३५५ कोटींची गुंतवणूक; ३०० शास्त्रज्ञांच्या नियुक्तीचा मानस

३५५ कोटींची गुंतवणूक; ३०० शास्त्रज्ञांच्या नियुक्तीचा मानस

विविध औद्योगिक वापराच्या विशेष रसायनांच्या निर्मितीतील बीएएसएफ समूहाने शुक्रवारी मुंबईमध्ये आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा व जागतिक धाटणीच्या ‘नवसंकल्पना केंद्रा’चे उद्घाटन केले. या प्रकल्पामध्ये बीएएसएफ समूहाकडून एकूण ५० दशलक्ष युरो (साधारण ३५५ कोटी रुपये) गुंतवणूक केली जाईल आणि ही समूहाची दक्षिण आशियातील सर्वात मोठी संशोधन आणि विकासामधील गुंतवणूक असेल.

बीएएसएफच्या या संकुलामधील सर्व जागतिक संशोधनाचे काम बीएएसएफ केमिकल्स इंडिया प्रा. लि.अंतर्गत असतील. ही बीएएसएफ एसईची १०० टक्के मालकीची उपकंपनी आहे. नवीन इनोव्हेशन कँपस कंपनीचे भारतातील विद्यमान संशोधन व विकास उपक्रमांना विस्तारित करून त्यामध्ये विशेष रसायनांच्या व्यापक श्रेणीवरील जागतिक आणि प्रादेशिक संशोधनाचा समावेश करेल. या विषयांमध्ये वैयक्तिक व घरगुती निगा, प्रक्रिया विकास, सेंद्रिय संश्लेषण, पीक संरक्षण आणि अनेक गोष्टींचा समावेश होईल.

ऊर्जा, अन्न आणि स्वच्छ पाण्याची वाढती गरज, मर्यादित स्रोत आणि वाढती जागतिक लोकसंख्या यामुळे जी मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्यावर रसायनांवर आधारित नवीन कल्पनांमुळे उपाय शोधून काढण्यास मदत होईल आणि हे केंद्र त्या दिशेनेच पाऊल असल्याचे बीएएसएफ एसईच्या संचालक मंडळाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी डॉ. मार्टिन ब्रुडरमिलर म्हणाले. परिणामी बीएएसएफ खास करून आशियातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आपले संशोधन व विकासाचे जाळे विस्तारत आहे आणि मोठय़ा प्रमाणावर वाढत असलेल्या भारतीय बाजारपेठेत अस्तित्व राखण्यासाठी मुंबईसारखे दुसरे ठिकाण सापडणे अशक्यच होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हे केंद्र २००५ मध्ये स्थापित झाले असून २०१४ पासून त्यात विस्ताराचे काम हाती घेण्यात आले. सुमारे २०,००० चौरस मीटरच्या आवारात शास्त्रज्ञांसाठी निवास आणि तांत्रिक प्रयोगशाळा, आधुनिक कार्यालये, पूर्ण क्षमतेचे परिषद सभागृह, कॅफेटेरिया आणि कर्मचाऱ्यांसाठी सुविधांचा समावेश आहे. या केंद्रात संशोधन व विकास कार्यासाठी ३०० शास्त्रज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. बीएएसएफ समूहाच्या भारतातील चार उपकंपन्यांनी एकत्र मिळून गेल्या चार वर्षांत संशोधन व विकास उपक्रमांवर ३० कोटी युरो (२२०० कोटी रु.) इतकी गुंतवणूक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:01 am

Web Title: basf new concept center
Next Stories
1 सेवा क्षेत्र पूर्वपदावर!
2 रोख उलाढालींवर बँकांची भरमसाठ शुल्कवसुली आर्थिक दहशतीचाच प्रकार!
3 ‘जीएसटी’ची कमाल मात्रा ४० टक्क्यांची?
Just Now!
X