अभिनेता सलमान खानचा सेवाभावी उपक्रम ‘बीईंग ह्यूमन’ या नावाने तयार वस्त्रे आणि विक्री दालनांचा विशेष परवानाप्राप्त असलेल्या मंधाना इंडस्ट्रीज आता या ब्रॅण्डअंतर्गत स्त्रियांची तयार वस्त्रांची श्रेणी दाखल करीत आहे.
महिलांनी वापरावयाची टॉप्स, जीन्स, शॉर्ट्स आणि चिनोज् अशी वस्त्रे असलेली ही बीईंग ‘मन वुमेन्सवेअर आगामी महिन्यात देशभरातील सध्याच्या १२५ विक्री दालनांमध्ये उपलब्ध होतील, अशी माहिती मंधाना इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष मंधाना यांनी दिली. सध्या ‘बीईंग ह्यूमन’ स्टोअर्स मुंबईत लिकिंग रोड-वांद्रे, पीएमसी – कुर्ला, आर सिटी मॉल घाटकोपर तसेच अहमदाबाद व लुधियाना येथे कार्यरत असून, शिवाय शॉपर्स स्टॉप, लाइफ स्टाइल, स्प्लॅश, झेड ब्लू या विक्री दालनांमध्येही बीईंग ह्यूमन तयार वस्त्रे उपलब्ध आहेत. लवकरच मुंबईत आणखी ३, पुण्यात दोन आणि देशभरात अन्यत्र १० अशी एकूण २० बीईंग ह्यूमन स्टोअर्स तसेच डिसेंबर २०१३ पर्यंत ५० बीईंग ह्यूमन स्वतंत्र दालने आणि १५० फ्रँचाइझी स्टोअर्स सुरू करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे मंधाना यांनी सांगितले. या शिवाय ‘मायंत्रा डॉट कॉम’ या ऑनलाइन विक्री दालनावरही बीईंग ह्यूमन वस्त्रे उपलब्ध होत आहेत. यातून सध्या एकूण महसुलात ६० कोटी रु. असलेला (जेमतेम ५ टक्के) किरकोळ विक्री उपक्रमाचा हिस्सा आगामी आर्थिक वर्षांपर्यंत रु. २५० कोटींवर जाणे अपेक्षित असल्याचे मंधाना यांनी स्पष्ट केले.