आखीव परिघाबाहेरचा विचार करणाऱ्याना नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते. पुढारलेल्या पाश्चिमात्य राष्ट्रातील गॅलिली गॅलीलिओसारख्या खगोलशास्त्रज्ञापासून भारतातील आगरकर, कर्वे या समाजशास्त्रज्ञांनादेखील याच अनुभावातून जावे लागले. बेन बर्नान्के नावाचा अर्थतज्ज्ञ आज जगातील सर्वात बलाढय़ मध्यवर्ती बँकेचा प्रमुख म्हणून पदावरून खाली उतरत असताना त्यांनी फेडरल रिझव्‍‌र्हचा अध्यक्ष या नात्याने शेवटच्या पत्रकार परिषदेत काढलेले उद्गाराचा त्यांनाही याचा अनुभव आल्याचे द्योतक आहे. बर्नान्के यांना त्यांच्या धोरणांबाबत विचारले असता, ‘माझी धोरणे जगाला मंदीतून बाहेर यायला सहाय्यभूत होती की नाही हे केवळ काळच ठरवेल’ असे ते म्हणाले.
जानेवारी २००८ ते ऑक्टोबर २०१३ पर्यंत चालालेल्या प्रदीर्घ मंदीच्या काळात फेडचे प्रमुख असलेल्या बर्नान्के यांचा गुरुवारी फेडचे अध्यक्ष म्हणून शेवटचा दिवस होता. शुक्रवारी फेडच्या नवीन अध्यक्षा म्हणून नेमणूक झालेल्या जेनेट येलन यांचा पदग्रहण सोहळा व या पदाची त्या अधिकृतरित्या सूत्रे स्वीकारतील. अर्थशास्त्रात उदार आíथक धोरणे राबविण्याला ‘क्यूई’ किंवा ‘क्वांटेटेटिव्ह इिझग’ अशी संज्ञा ही बर्नान्के यांची देणगी आहे. अल्प मुदतीचे व्याजदर कमी ठेऊन नागरिकांना कर्ज घेऊन खर्च करायला प्रवृत्त करण्यासाठी ही धोरणे राबविण्यात आली. दर महिन्याला ८५ अब्ज डॉलरचे रोखे स्वत: फेड खरेदी करत आहे. जानेवारीपासून ही मर्यादा कमी करून ७५ अब्ज तर आता फेब्रुवारीपासून ६५ अब्ज डॉलर इतके कमी करण्यात आली. जानेवारी २०१५ पासून ही रोखे खरेदी पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. बर्नान्के यांच्या कारकिर्दीचे कोणी उद्या विश्लेषण करविण्याचे ठरवेले तर आज तरी ही धोरणे सकारात्मकच होती, असा निष्कर्ष निघेल. डॉलर छापून जगात नोटांचा पाऊस पाडला असे म्हटले तर ती अतिशोयोक्ती होणार नाही. तीन फेऱ्यात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बर्नान्के यांनी सरकारच्या परवानगीने मोठय़ा प्रमाणात नोटा छापल्या. त्यांचे पुर्वासुरी राहिलेले अ‍ॅलन ग्रीनस्पॅन हे परंपरावादी अर्थतज्ज्ञ होते. या पाश्र्वभूमीवर बर्नान्के यांची, ‘पुस्तकात न शिकावेलेल्या अनेक गोष्टी आपल्या कल्पनेतून बर्नान्के यांनी वास्तवात आणल्या. त्यांच्या कल्पनाशक्तींची झेप व आपल्या कल्पनांवरचा आत्मविश्वास याचा अनुभव आम्ही प्रत्येक बठकीत घेतला. त्यांची सृजनशीलता एखाद्या कलाकाराहून कमी नाही,’ अशी स्तुती बर्नान्के यांचे माजी सहकारी फेडचे गव्हर्नर राहिलेले लॉरेन्स मेयर यांनी काढले. ‘सुरवातीच्या काळात वेडा म्हणून त्यांची संभावना करण्याचा मोह अनेकदा मलाही झाला. परंतु केवळ शिष्टाचार म्हणून मी तो मोह टाळला. परंतु आज हिच धोरणे अमेरिकेला मंदीतून तारू शकली हे सत्य आहे,’ असेही ते पुढे म्हणतात.