शेअर बाजाराची तऱ्हाच वेगळी आहे. येथे आज गुंतलेले १०० रुपडे रातोरात दुपटीने वाढून दुसऱ्या दिवशी २०० वर गेलेले दिसतील, तर तिसऱ्या दिवशी पुन्हा शे-सव्वाशेच्या पूर्वपदाला आलेले असतील. फायदा दुपटीवर गेलेला तर दिसला, पण वेळीच कमावला नाही अन् कागदावरच राहिला. ज्या गतीने फायदा उंचावला, त्याच गतीने कमावलेले सर्व जवळपास नुकसानीला पोहचले, असा अनुभव गेल्या काही वर्षांत अनेकांनी निश्चितच गाठी बांधला असेल. विशेषत: शेअर बाजारासाठी मे महिना हा अशा दगलबाजीसाठी इतिहासकीर्त आहे. यंदाच्या मे महिन्याला तर लोकसभा निवडणूक निकालांची पाश्र्वभूमी आहे. गेल्या महिन्यात विशेषत: १५ एप्रिलपासून सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी दिवसागणिक नवनवीन उच्चांक बनविण्याचा क्रम सुरू ठेवलेला आपण पाहिले. पण मे महिना जसा नजीक येऊ लागला तशी बाजाराला उतरती कळा लागली. गेले सलग सहा दिवस बाजारातील या निर्देशांकाधारित सुधारणेत, सेन्सेक्स-निफ्टीला घरघर लागली आहे, तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक वाढत असल्याचे जे चित्र आहे, तेच मुळी वर व्यक्त केलेल्या साशंकतेला खतपाणी घालणारे आहे.
निवडणूकपूर्व तेजीने बाजारात बराच उत्साह भिनविला हे निश्चितच! याचा परिणाम प्रायमरी मार्केटवरही दिसून आला. बऱ्याच काळाने बाजारात आलेला फारसा परिचित नसलेल्या वंडरेला हॉलिडेज् या कंपनीच्या ‘आयपीओ’ला तब्बल ३८ पटींहून अधिक भरणा व्हावा, हे खरे तर आश्चर्यकारकच! पण दुसऱ्या बाजूला हेही खरे, विद्यमान तेजीने आता तिचा शेवट गाठला आहे. त्यामुळे सुज्ञ गुंतवणूकदारांना सांगावेसे वाटते की, निकालाची वाट पाहू नका, त्या आधीच नफा पदरी बांधता येईल का ते पाहून घ्या. हा असा काळ आहे, ज्यायोगे आपल्या पोर्टफोलियोत शक्य ते फेरबदल केले जावेत. कोणत्याही स्थितीत तग धरू शकतील अशा शेअर्सना हात न लावता, तकलादू तसेच हाय-बीटा शेअर्सपासून फायद्यासह पिच्छा सोडवता आला तर बरेच! एका व्यावसायिक गुंतवणूकदाराच्या दृष्टीने १६ मेच्या निवडणूक निकालाचे कवित्व काय असावे ते हे इतकेच!
तरीही मे महिन्यात, बाजाराच्या सार्वत्रिक अपेक्षेप्रमाणे निकाल आल्यास, सेन्सेक्सचा २३ हजारापल्याड २३,१२६ पर्यंत नवीन उच्चांक दिसू शकण्याची शक्यता तांत्रिक विश्लेषक वर्तवीत आहेत. मोदी सरकारप्रणीत कौलाच्या अपेक्षेने गुंतवणूक करणारे जोखीम घेऊ इच्छित असतील, तर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, अडानी पोर्ट्स, येस बँक, गेल इंडिया, कॉन्कोर, आयसीआयसीआय बँक वगैरेंना आपले गुंतवणूक लक्ष्य बनविता येईल.
शिफारस :
वातावरणावर अनिश्चिततेचे सावट आहे, अशा वेळी नवीन खरेदी टाळायलाच हवी. तरी दीर्घकालीन खेरदीचा उद्देश असेल तर स्मॉल कॅप धाटणीचा ‘बसंत अ‍ॅग्रो टेक’ समभाग योग्य वाटतो. कंपनीचा उमदा वृद्धिपथ सुस्पष्ट आहे. एक रुपया दर्शनी मूल्याचा आणि सध्या चार रुपयांना उपलब्ध असलेल्या या शेअर्ससाठी फायदा-जोखीम समीकरण पथ्यावर पडणारे आहे.
बाजार गप्पा:

यंदाच्या अनेकांगाने महत्त्वपूर्ण असलेल्या निवडणुकांचे निकाल काय, यावर बाजाराचे संपूर्ण लक्ष आहे. १६ मे हा निकालाचा दिवस शुक्रवारी म्हणजे बाजारात व्यवहार होणारा सप्ताहाचा शेवट दिवस आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रावर मतदान झाल्याने मतमोजणीही झटपट होत असली, तरी अटीतटीची स्थिती आल्यास नेमका कौल दुपापर्यंत स्पष्ट होणार नाही. त्यामुळे बाजाराला या निकालावरील प्रतिक्रिया दोन दिवस उशिराने म्हणजे सोमवारीच नोंदविता येणे हे न्यायोचित ठरणार नाही, असे काही दलाल मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळे एक तर शुक्रवारची बाजाराची वेळ संध्याकाळपर्यंत वाढविण्यात यावी अथवा शनिवारी विशेष सत्राद्वारे बाजाराचे व्यवहार व्हावेत, अशी मंडळींची मागणी आहे. अर्थात या मागणीवर निर्णय घेतला गेलेला नाही. मुळात ती दखलपात्र ठरावी इतके पाठबळही मागणी करणाऱ्यांनी मिळविले आहे, असे दिसून येत नाही.