News Flash

जागतिकीकरणाचे फायदे उदयोन्मुख देशांबरोबर वाटून घ्यावेत – रघुराम राजन

पाश्चिमात्य देशांपुढे सध्या तंत्रज्ञान, वयस्कर लोकसंख्या आणि हवामान बदल ही आव्हाने आहेत.

| January 24, 2018 02:16 am

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वाढत्या थकीत कर्जाला (एनपीए) तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांबरोबर जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे फायदे वाटून न घेता पाश्चिमात्य जग फार काळ पुढे जाऊ शकणार नाही. हा भेदभाव आताच दूर केला नाही तर खंडित जगाचे प्रश्न कुणीच सोडवू शकणार नाही, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी येथे व्यक्त केले.

कुठल्याही देशाचे नाव न घेता त्यांनी सांगितले की, पाश्चिमात्य देशांनी त्यांची लोकसंख्या वयोवृद्ध होत आहे हे जाणून घेऊन त्यांच्या उत्पादनांना असणारी मागणी उदयोन्मुख देशांच्या लोकांकडूनच असणार आहे हे विसरता कामा नये.

जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत बोलताना राजन यांनी सांगितले, की कालांतराने पाश्चिमात्य जगाला उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांची मदत घ्यावी लागणार आहे. त्या वेळी आधी तुम्ही फायद्यांचे वाटप या देशांबरोबर का केले नाही या अप्रिय प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या भल्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, अन्यथा खंडित जगाचे प्रश्न सोडवण्याची संधी त्यांनी गमावलेली असेल.

पाश्चिमात्य देशांपुढे सध्या तंत्रज्ञान, वयस्कर लोकसंख्या आणि हवामान बदल ही आव्हाने आहेत. उत्पन्न असमानतेमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाांवर काही प्रमाणात सिंगापूरने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तेथे मध्यम व कमी उत्पन्न गटाच्या कुटुंबाचे गृहप्रकल्प एकाच ठिकाणी आहेत असे सांगून ते म्हणाले की, अमेरिकेबाबत मी काही सांगू शकत नाही पण इतर काही देशात यावर प्रयत्न सुरू आहेत. सरकार यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. अर्थशास्त्रज्ञांवर आता मोठी जबाबदारी आहे, त्यांना काही समस्यांवर उत्तरे आम्ही शोधून देऊ याची खात्री लोकांना द्यावी लागेल. कुठल्याही मोठय़ा कल्पना या १५ ते २० वर्षे आधी जन्माला याव्या लागतात, या वास्तवाचे भान ठेवले पाहिजे.

सामायिक मूलभूत उत्पन्न या संकल्पनेवर बोलताना आपण ती आता केवळ बाजूला सारून टाकू शकत नाही कारण लोक त्यावर बोलू लागले आहेत, असे राजन यांनी सूचित केले. चालकविरहित मोटारी आता दृष्टिपथात आहेत, पण त्यामुळे लोकांच्या नोक ऱ्या जाणार आहेत त्याचा विचार टाळता येणार नाही. हे लोक बेरोजगार होतील तेव्हा आपण काय करणार आहोत याचा विचार आताच करावा लागेल. आर्थिक संकल्पना व वास्तव कथा याकडे अर्थशास्त्रज्ञ दुर्लक्ष करतात, पण ते चालणार नाही.

दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यापारी अडथळे तोडून एकत्र यावे लागले हे विसरता कामा नये. आपण बराच काळ तंत्रज्ञानाला मुक्तहस्त दिल्यामुळे आर्थिक विकासही झाला, पण नंतर डावे-उजवे असा संघर्ष होत गेला. जागतिक आर्थिक पेचामुळे हे प्रश्न विचारण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 2:16 am

Web Title: benefits of globalization raghuram rajan
Next Stories
1 Budget 2018 – पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, तेल मंत्रालयाचीच मागणी
2 शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप; सेन्सेक्स पहिल्यांदाच ३६ हजारावर, निफ्टीही ११,००० पल्याड
3 भारतीय अर्थव्यवस्थेबाबत उद्योजक आशावादी
Just Now!
X