नाजूक बनलेल्या अर्थव्यवस्था आणि चलनातील तीव्र स्वरूपाचे अवमूल्यन यामुळे प्रचंड ताणाखाली असलेल्या आदरातिथ्य क्षेत्रात, उमेद जागविणाऱ्या योजना आघाडीची बिझनेस हॉटेल्सची शृंखला असलेल्या बरग्रुएन हॉटेल्सने (कीज् हॉटेल) घोषित केल्या. ‘कीज् क्लब’ या नव्या ब्रॅण्डनावासह व्यापार-उदिमानिमित्त प्रवास करणाऱ्या श्रीमंत पाहुण्यांसाठी ४ व ५ तारांकित वर्गवारीतील सेवा देणाऱ्या उच्च श्रेणीच्या हॉटेल्समध्ये प्रवेशाची कंपनीने घोषणा केली. दरसाल या श्रेणीतील किमान दोन नवीन हॉटेल्ससह तीन वर्षांत देशभरातील एकूण हॉटेल्सची संख्या सध्याच्या तुलनेत दुपटीने वाढवून, ७५ वर नेण्याचे नियोजन तिने आखले आहे.  
अत्यंत परवडण्याजोग्या दररचनेत तरतरीत आणि तत्पर बिझनेस श्रेणीच्या सेवांची अनुभूती हव्या असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापक दर्जाची मंडळी आणि अन्य व्यवसायानिमित्त प्रवासाला निघालेल्या पाहुण्यांना आकर्षित करण्याचे ‘कीज् क्लब’ ब्रॅण्डचे लक्ष्य असेल, असे बरग्रुएन हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्याधिकारी संजय सेठी यांनी सांगितले.
बरग्रुएन हॉटेल्सच्या आक्रमक नियोजनासंबंधी विस्ताराने बोलताना संजय सेठी यांनी स्पष्ट केले की, ‘‘२०१६ पर्यंत आमचा ७५ हॉटेल्सपर्यंत विस्तार होईल आणि ज्यायोगे एकूण ताफ्यातील खोल्यांची संख्या ही ६६०० वर पोहचू शकेल. आम्ही लक्ष्य निर्धारित केलेली शहरे पुणे, मुंबई, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर), अहमदाबाद, चेन्नई, जयपूर, कोलकाता आणि हैदराबाद येथे या ठिकाणी प्रत्येक वर्षी किमान दोन नवीन कीज् क्लब हॉटेल्स उभी राहतील, असे नियोजन आहे.’’
२०१६ पर्यंत स्व-मालकीच्या आणि स्वचालित हॉटेल्सद्वारे ४१० कोटी रुपयांच्या एकत्रित महसुली उत्पन्नाची कंपनीला अपेक्षा आहे. कंपनीची एकूण कर्मचारी संख्याही यातून ४००० वर जाईल. कीज् ब्रॅण्डअंतर्गत सध्या भारतात ३५ मालमत्ता असून, त्यातील २१ मालमत्ता निर्मितीच्या विविध टप्प्यांवर असून यथावकाश ही हॉटेल्स सुरू होतील. सध्या एकूण खोल्यांची संख्या १३०० इतकी आहे.