X

पायाभूत क्षेत्रात पाच महिन्यांतील सर्वोत्तम वाढ

यंदा कोळसा उत्पादन १५.३ टक्के, नैसर्गिक वायू ४.२ टक्के आणि ऊर्जा निर्मिती १०.३ टक्क्यांनी वाढली आहे.

कोळसा, ऊर्जा निर्मितीमुळे ऑगस्टमध्ये ४.९ टक्क्यांनी झेप

कोळसा, स्टील, सिमेंट आदी प्रमुख सहा क्षेत्रांचा समावेश असलेल्या पायाभूत क्षेत्रात यंदाच्या ऑगस्टमध्ये वाढ नोंदली आहे. ४.९ टक्के अशी झेप घेताना ती गेल्या पाच महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

कोळसा, स्टील, सिमेंट, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, ऊर्जा आदी सहा क्षेत्रांचा समावेश पायाभूत क्षेत्र म्हणून होतो. यंदा ही क्षेत्रे वाढली आहेत. वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१६ मध्ये या क्षेत्राची वाढ ३.१ टक्के नोंदली गेली होती. तर आधीच्या, जुलैमधील या क्षेत्राचा वेग २.६ टक्के होता. यंदाच्या ऑगस्टमधील पायाभूत क्षेत्राची वाढ ही मार्च २०१७ मधील ५.२ टक्क्यांनंतरची सर्वोत्तम वाढ आहे.

यंदा कोळसा उत्पादन १५.३ टक्के, नैसर्गिक वायू ४.२ टक्के आणि ऊर्जा निर्मिती १०.३ टक्क्यांनी वाढली आहे. तर कोळसा, नैसर्गिक वायू, ऊर्जा क्षेत्राने यंदा नकारात्मक वाढ नोंदविली आहे. शुद्धीकरण उत्पादन क्षेत्र घसरून २.४ टक्के तर स्टील उत्पादन कमी होत ३ टक्क्यांवर आले आहे. वर्षभरापूर्वी ते दोन्ही अनुक्रमे २.५ व १६.७ टक्के होते.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते ऑगस्टमध्ये या पहिल्या पाच महिन्यातील पायाभूत क्षेत्राची वाढही वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ५.४ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ३ टक्के झाली आहे.

निर्मिती क्षेत्राचा मापदंड मानले जाणाऱ्या देशाच्या औद्योगिक उत्पादनात प्रमुख पायाभूत क्षेत्राचा हिस्सा ४१ टक्के आहे.

निर्मिती क्षेत्राच्या पीएमआयमध्येही वाढ

देशातील निर्मिती क्षेत्र सलग दुसऱ्या महिन्यात विस्तारले आहे. वाढीव उत्पादन, नवीन मागणी आणि रोजगारातील वाढ यामुळे भारताचा निक्केई निर्मिती खरेदी व्यवस्थापकांचा निर्देशांक सप्टेंबरमध्ये ५१.२ अंशनोंदला गेला आहे. ५० अंश निर्देशांक समाधानकारक मानला जातो. वर्षभरापूर्वी हा निर्देशांक समकक्ष, ५१.१ टक्के होता. निक्केई निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्किटने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताचा विकास दर ६.८ टक्के अंदाजित केला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत हा दर ५.७ टक्के असा गेल्या तीन वर्षांच्या तळात नोंदला गेला आहे.

Outbrain