भारतीय कंपन्यांच्या डिसेंबरअखेर तिमाही निकाल हंगामाचा दमदार बार इन्फोसिस टेक्नॉलॉजीजच्या निकालाने शुक्रवारी उडवून दिला. गेल्या तिमाहीपासून आर्थिक कामगिरीत दिसून सुधार हा चिरस्थायी असल्याचे ताजा निकालांनी दर्शविलेच, पण बाजारात अनेक विश्लेषकांनी कंपनीच्या नफ्याविषयी केलेले अंदाज तोकडे ठरवून त्यावर मात केली.
इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. शिबूलाल यांनी डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या २८७५ कोटीचा नफा जाहीर करत आश्चर्याचा सुखद धक्का दिला. मागील तिमाहीपेक्षा विक्रीत जवळजवळ अध्र्या टक्क्याची वाढ होत एकूण १३,२०६ कोटी झाली. त्याचबरोबर चालू आíथक वर्षांत विक्री २४.५ ते २५% वाढण्याचे संकेत दिले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना २०१४ साठीची वार्षकि वाढ २१-२२% दरम्यान असेल असा अंदाज शिबूलाल यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील इन्फोसिसने डॉलरमधील नफ्यात ६.७% वाढीची नोंद केली गेली. इन्फोसिसची मदार असलेला प्रमुख ग्राहकवर्ग हा अमेरिका-युरोपमधील असून, वर्षअखेर सुट्टय़ांचा काळ पाहता कंपनीची डिसेंबर तिमाहीतील कामगिरी तुलनेने कमजोरच असते. परिणामी उत्पन्नात वाढ दोन टक्क्यांखाली असली तरी निव्वळ नफा मात्र दमदार २१ टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबरअखेरीस इन्फोसिसकडे असलेल्या बँक ठेवी व रोकड सदृश्य मालमत्तेत २६,९०७ कोटींवरून वाढ होत डिसेंबरअखेर२७,४४० कोटी झाली आहे.
कंपनीने या तिमाहीत ५४ नवीन ग्राहक जोडले व ३०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक रकमेच्या २० नवीन कंत्राटांवर या तिमाहीत शिक्कामोर्तब केले. कंपनीने डॉलरमधील विक्रीत ११.५-१२% वार्षकि वाढीचे संकेत दिले आहेत. याआधी हा अंदाज ९-१०% वाढीचा होता. फॉच्र्युन ५०० श्रेणीतील कंपन्यांनी आपल्या २०१४ च्या अंदाजपत्रकात माहिती तंत्रज्ञानावर खर्च करण्यात येणाऱ्या रकमेची मोठी तरतूद केली आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येत असल्याचा हा सकारात्मक संकेत असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाचे मत आहे. जानेवारी ते मार्च २०१४ या तिमाहीत मोठय़ा संख्येने मागण्या नोंदविल्या जातील व त्यामुळे व्यवसाय वाढीला मोठी चालना मिळणे अपेक्षित आहे. मोठय़ा प्रमाणात आधी नक्की झालेल्या कंत्राटांची कामे सुरू होऊन कंपनीची नफ्याच्या पातळीत ३% वाढ होण्याची आशा असल्याचे शिबूलाल यांनी सागितले.
* समभागाची ३% उसळी!
इन्फोसिसचा समभाग ३,५७५ चा उच्चांक गाठत शुक्रवारी बाजार बंद होताना १०५ रुपयांची बढत घेत अर्थात ३.०५% वर बंद झाला. बहुतांशांचे नफ्याचे अंदाज तोकडे ठरविणाऱ्या इन्फोसिसच्या निकालांवर विश्लेषकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘‘अमेरिकेच्या सुधारत असलेल्या अर्थव्यवस्थेचा इन्फोसिसला फायदा झाला तसा रुपया अवमूल्यानाचाही फायदा इन्फोसिसची एकूण नफा क्षमता वाढण्यात झाला. सद्यस्थितीत रुपया स्थिरावत आहे तर सार्वत्रिक निवडणुकीमुळे बाजाराला अस्थिरतेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सद्य भावात इन्फोसिस विकून नफा पदरात पाडून घेणे हितावह ठरेल,’’ असे गुंतवणूक विश्लेषक मििलद अंध्रुटकर यांनी सांगितले. इन्फोसिसच्या निकालाचा सुपरिणाम म्हणून एचसीएल टेक्नालॉॅजी, टीसीएस, टेक मिहद्र आदींनी भावात वार्षकि उच्चांक नोंदविले.  
ल्ल गेले ते महत्त्वाकांक्षेचे बळी!
गेल्या दोन तिमाहीपासून इन्फोसिस सोडून गेलेल्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘महत्त्वाकांक्षेचे बळी’ अशी संभावना शिबूलाल यांनी केली. परंतु इन्फोसिसमधील वरिष्ठ व्यवस्थापनाचे हस्तांतरण अपेक्षेप्रमाणे होत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. इन्फोसिसमध्ये कर्मचारी संरचना कुठल्याही जागतिक दर्जाच्या कंपनीत असते तशी असल्यामुळे जे कोणी सोडून गेले त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होणार नाही. उलट कार्यक्षम कर्मचाऱ्यांना बढतीची संधी मिळाली. इन्फोसिसच्या संचालक मंडळात रिकाम्या झालेल्या दोन जागा भरल्या असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र संचालक मिलिंद सातवळेकर १३ नोव्हेंबर रोजी संचालकपदाची मुदत संपल्यामुळे पायउतार झाले. त्यांची जागा बायोकॉनच्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ यांच्या नेमणुकीने तर ३१ डिसेंबरपासून व्ही. बालकृष्णन यांनी संचालक मंडळाचा व कंपनीच्या सेवेचा राजीनामा दिल्याने रिकामी झालेली जागा यू. बी. प्रवीण राव यांच्या पदोन्नतीने भरण्यात आली. राव यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. इन्फोसिसने जरी या तिमाहीत ६६८२ कर्मचारी नव्याने नियुक्त केले तरी मागील तिमाहीपेक्षा एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १८२३ ने घटून १,५८,४०४ झाल्याचे त्यांनी सांगितले.