तीन सत्रांतील घसरणीला अटकाव

भांडवली बाजारातील सलग तीन व्यवहारांतील घसरण अखेर मंगळवारी थांबली. आशियाई बाजारातील तेजीच्या जोरावर त्यामुळे सेन्सेक्सला गेल्या २० महिन्यांच्या गाळातूनही बाहेर काढले; तर निफ्टीलाही त्याचा ७,४०० वरील स्तर पुन्हा गाठता आला.

२९१.४७ अंश वाढीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४,४७९.८४ वर पोहोचला, तर ८४.१० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ७,४३५.१० पर्यंत मजल मारली. प्रमुख निर्देशांकाची २०१६ मधील सोमवारची झेप सर्वोत्तम ठरली. आशियाई बाजारातील तेजीच्या वातावरणातच मंगळवारच्या येथील बाजारांची सुरुवात झाली. २४,२५७.२८ ने सत्रारंभ करणारा मुंबई निर्देशांक व्यवहारात २४,५०० च्या पल्याड, २४,५६३.३४ पर्यंत झेपावला.

गेल्या तीन व्यवहारांत सेन्सेक्स ६६६ अंशांनी घसरला आहे. देशातील गेल्या महिन्यातील घसरती निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे २८ डॉलर प्रति पिंपपर्यंत आलेल्या दरांचा हा परिणाम होता.

क्षेत्रीय निर्देशांकामध्ये भांडवली वस्तू, बँक, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, आरोग्यनिगा, वाहन, तेल व वायू आदी तेजीत आघाडीवर राहिले. २.८५ टक्क्यांसह भांडवली वस्तू निर्देशांक सर्वात पुढे होता. बाजार व्यवहारानंतर सायंकाळी ३८ टक्क्यांच्या वाढीचे तिमाही निष्कर्ष जाहीर करण्यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग २.५१ टक्क्यांनी वाढला. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांचे मूल्य उंचावले. त्यामध्ये अदानी पोर्ट्स, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एल अ‍ॅण्ड टी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, भेल, ओएनजीसी यांचा क्रम राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही १.७५ टक्क्यांपर्यंत वाढले होते. गेल्या काही व्यवहारांत प्रमुख निर्देशांकाच्या तुलनेत या निर्देशांकातील घसरण मोठी होती.

२०१५ मधील चौथ्या तिमाहीत (कॅलेंडर वर्ष) चीनने ६.८ टक्के असा विकासदर गाठला असून तो अपेक्षेनुरूप असल्याचे मत व्यक्त करत गुंतवणूकदारांनी आशियातील हाँगकाँग, जपान, शांघाय येथील निर्देशांकांमध्ये ३.२ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविणे भाग पाडले. यामुळे युरोपातील बाजारातही सुरुवातीला तेजीचे वातावरण होते.