21 October 2018

News Flash

सांगतसे जना, ‘आधार’ नोंदणी सत्वर करा!

लोकांच्या दैनंदिन जीवनमानाशी वित्तीय सेवा जगताचे विविध घटक थेट निगडित आहेत.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

लोकांच्या दैनंदिन जीवनमानाशी वित्तीय सेवा जगताचे विविध घटक थेट निगडित आहेत. बँकांचे खातेदार, ठेवीदार, विमा पॉलिसीधारक ते म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदार म्हणून आपल्या प्रत्येकाला या सेवांच्या बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. तुमच्या अशाच सेवाविषयक शंका-प्रश्नांचे तज्ज्ञांद्वारे समाधान करणारा स्तंभ प्रत्येक शनिवारी..

* म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला आधार नोंदणी करणे आवश्यक आहे का?

– प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला आपला फोलिओ (गुंतवणुकीचे खाते) ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार क्रमांकाशी संलग्न करणे सक्तीचे आहे. ही औपचारिकता एकदाच करायची आहे. मुख्य फोलिओधारक आणि सहफोलिओधारक यांचे आधार क्रमांक फोलिओशी संलग्न करणे आवश्यक आहे. ज्या फोलिओसाठी मुख्यत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी) दिलेली आहे त्या फोलिओसाठी मुखत्यारपत्रधारक आणि अल्पवयीन मुलांच्या नांवे गुंतवणूक करणाऱ्या पालकांचे आधार संलग्न करणे आवश्यक आहे.

* आधार आणि फोलिओ यांची सांगड घालण्यापासून कोणाला सवलत देण्यात आली आहे काय?

– एनआरआय, जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड राज्यांत वास्तव्यास असलेल्या गुंतवणूकदारांना आधार आणि फोलिओ यांची सांगड घालण्यापासून सवलत देण्यात आली असून त्यांनी आधार बदल्यात मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट यासारखे ओळखपत्र आपल्या फोलिओशी संलग्न करणे गरजेचे आहे.

* म्युच्युअल फंडाचा फोलिओ आणि आधार क्रमांक संलग्न न केल्याचे काय परिणाम होतील?

– पूर्व निर्धारित तारखेपर्यंत आधार क्रमांक संलग्न न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते (फोलिओ) गोठवले जाईल. खाते गोठवले गेल्यास त्या खात्यासंबंधी कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

* फोलिओशी आधार कसे संलग्न करावे?

भारतातील म्युच्युअल फंड उद्योगांसाठी वेगवेगळ्या कंपन्या रजिस्ट्रार अ‍ॅन्ड ट्रान्स्फर एजंट म्हणून काम करतात. या रजिस्ट्रार अ‍ॅन्ड ट्रान्स्फर एजंट कंपन्यांनी  आधार आणि फोलिओ संलग्न करण्यासाठी ऑनलाइन दुवे (लिंक) उपलब्ध करून दिल्या असून त्या माध्यमातून आधार आणि फोलिओ संलग्न करता येईल. म्युच्युअल फंडघराण्यांच्या शाखेत जाऊन स्वत: आधार कार्डधारक आपला फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घालू शकतो. एसएमएसच्या माध्यमातूनसुद्धा आपला फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घालता येते. या व्यतिरिक्त तुम्ही फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घालण्यासाठी तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घेऊ शकता. ऑनलाइन दुवे खालीलप्रमाणे आहेत.

http://www.camsonline.com/InvestorServices/COL_Aadhar.aspx

https://www.sundarambnpparibasfs.in/web/service/aadhaar/

https://www.karvymfs.com/karvy/Aadhaarlinking.aspx

https://accounts.franklintempletonindia.com/guest/#/customerservices/updateaadhaar/accountdetails

* माझा फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घातली गेली आहे हे मला कसे कळेल?

– आधार आणि म्युच्युल फंड खाते यांची यशस्वी सांगड घातली गेल्याची तुम्हाला ईमेल साधारणपणे १५ दिवसात पाठवण्यात येते. तसेच खातेधारकाच्या अकाउंट स्टेटमेंटवर खातेधारकाच्या आधार क्रमांकाची नोंद होते.

* हिंदू अविभक्त कुटुंबे (एचयूएफ), भागीदारी कंपन्या आणि कंपन्या यांच्या फोलिओशी आधार क्रमांक संलग्न कसे करता येईल?

– हिंदू अविभक्त कुटुंबाच्या गुंतवणुकीच्या संदर्भात त्या कुटुंबाच्या कर्त्यांच्या फोलिओशी ‘आधार’ची सांगड घालणे गरजेचे असते तर भागीदारी कंपन्यांत गुंतवणुकीची सांगड भागीदारांच्या आधार क्रमांकाशी घालणे गरजेचे आहे तर कंपन्यांच्या बाबतीत अधिकृत स्वाक्षरी कर्ते किंवा कंपनी सचिव यांच्या आधारची त्या कंपनीच्या फोलिओशी सांगड घालणे गरजेचे आहे.

’(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत)

जमेल तितक्या तुमच्या प्रश्नांना स्तंभात समाविष्ट करून त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न असेल, तेव्हा आपले प्रश्न – aaaarthmanas@expressindia.com या ईमेलवर युनिकोडमध्ये मराठीत टाइप करून पाठवा.)

First Published on January 13, 2018 5:47 am

Web Title: bhalchandra joshi article on aadhar card registration