देशातील तेलनिर्मिती क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलच्या खासगीकरणासाठी इच्छुक गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा अतिरिक्त कालावधी सरकारने देऊ केला आहे. या प्रक्रियेला पाचव्यांदा मुदतवाढ दिली गेली असून, आता अंतिम तारीख १६ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

केंद्राने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बीपीसीएलमधील सरकारचा संपूर्ण ५२.९८ टक्के मालकी हिस्सा विकून तिचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. खरेदीदारांना ७ मार्च २०२० पर्यंत स्वारस्य दाखविण्यासाठी सर्वप्रथम मुदत दिली गेली होती. ही मुदत पुढे २ मे, त्यानंतर १३ जून, ३१ जुलै आणि ३० सप्टेंबर अशी चार वेळा वाढविण्यात आली. सरकारने स्पष्टीकरण दिले नसेल, तरी खरेदीदारांकडून अपेक्षित रस दिसून न येणे हेच मुदतवाढीचे कारण सांगितले जाते.

बुधवारी मुंबई शेअर बाजारात बीपीसीएलच्या समभागाचा भाव तब्बल पावणेआठ टक्क्यांनी घसरून ३५३ रुपयांवर स्थिरावला होता. कंपनीचे एकूण बाजारमूल्य हे ७६,५०० कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. तर सरकारच्या मालकी हिश्शाचे मूल्यांकन हे ४१,४०० कोटी रुपये इतके होईल.