,६०० कोटींच्या मोबदल्यात पाच मंडळातील ४ जी व्यवसायाचे अधिग्रहण

अग्रणी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने तिकोना डिजिटल नेटवर्क्‍सचा ४ जी व्यवसाय १,६०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात अधिग्रहित करण्यासंबंधी उभयतांमध्ये सामंजस्य घडून आल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. तिकोनाकडे पाच दूरसंचार परिमंडळांमधील ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) आणि ३५० साइट्स यामुळे भारती एअरटेलच्या ताब्यात येणार असून, त्यामुळे एअरटेलच्या ४ जी सेवांचे जाळे संपूर्ण देशस्तरावर विस्तारले जाणार आहे.

तिकोनाकडे २३०० मेगाहर्ट्झ पट्टय़ामधील गुजरात, उत्तर प्रदेश (पूर्व), उत्तर प्रदेश (पश्चिम), राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या दूरसंचार परिमंडळांमध्ये एकूण २० मेगाहर्ट्झ ध्वनिलहरींचा वापर परवाना आहे. तिकोनाच्या या व्यवसायाच्या अधिग्रहणामुळे भारती एअरटेल या परिमंडळांमध्ये अस्तित्व निर्माण करता येईल आणि त्या ठिकाणी लवकरच आपल्या ४ जी सेवा सुरू केल्या जातील, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

हा ताबा व्यवहार पूर्ण झाल्यावर एअरटेलच्या ४ जी सेवांना सक्षमता मिळेल. देशातील १२ दूरसंचार परिमंडळांमध्ये २,३०० मेगाहर्ट्झ पट्टय़ात एअरटेलकडे एकूण ३० मेगाहर्ट्झ इतक्या ध्वनिलहरींचा वापर परवाना येईल. यातून वाढत्या डेटा (इंटरनेट) मागणीची पूर्तता एअरटेल करता येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.