देशातील अग्रेसर दूरसंचार सेवा असलेल्या भारती एअरटेलने मुंबईत ३१ लाख मोबाईलधारकांना सेवा प्रदान करणाऱ्या लूप मोबाईलवर ताबा मिळविण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे विश्वसनीयरित्या कळते. लूपने अलीकडेच झालेल्या दूरसंचार परवान्यांच्या लिलावात सहभाग घेतला नाही आणि तिच्या २० वर्षे जुन्या परवान्याची मुदतही संपुष्टात येत असल्याने हे विलीनीकरण तिला भाग ठरले आहे.
लुप मोबाईल (पूर्वीची बीपीएल मोबाईल) ही मुंबईतील सर्वात जुनी म्हणजे १९९५ मध्ये कार्यान्वित झालेली दूरसंचार सेवा असून, भारती एअरटेलने तिच्यावर ताब्यासाठी ७०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. लुपचे मुंबईतील ३१ लाख ग्राहक जमेस धरल्यास, एअरटेल ही ७१ लाख ग्राहकांसह मुंबईतील सर्वात मोठी दूरसंचार सेवा बनेल आणि सध्या ६९ लाख ग्राहकांसह अग्रस्थानी असलेल्या व्होडाफोनला पिछाडीवर टाकेल. शिवाय लुपकडे असलेले सुमारे ४०० मोबाईल टॉवर्स, ऑप्टिक फायबरचे जाळे, बेस स्टेशन्स अन्य पायाभूत सामग्रीवर एअरटेलची मालकी येईल. एअरटेलकडून या संबंधाने अधिकृत घोषणा लवकरच होणे अपेक्षित आहे, लुप मोबाईलने मात्र यासंबंधाने अद्याप अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही.
मोबाईलवरील इंटरनेटसमर्थ डेटा सेवांसाठी सर्वात परिणामकारक अशा ९०० मेगाहर्ट्झच्या धारेत लूपच्या वाटय़ाला असलेल्या मुंबईतील ध्वनिलहरी एअरटेल आणि व्होडाफोन यांनी गेल्या आठवडय़ात पार पडलेल्या लिलावातून मिळविल्या आहेत. एअरटेलने त्यासाठी २८१५ कोटी रुपयांची किमतही मोजली आहे. लुप मोबाईलचा परवाना लुप्त होणार असल्यामुळे मुंबईतील इतक्या बडा ग्राहकवर्गाची सेवा बाधित न होता एअरटेलकडे वर्ग करण्याचा पर्याय लुपने निवडला असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक कमाई मिळवून देणाऱ्या मुंबईची दूरसंचार बाजारपेठ लुपच्या एकूण ग्राहकांपैकी दोन-तृतीयांश मोबाईलधारक अशा सर्वाधिक लाभाच्या पोस्ट-पेड सेवांमधील आहेत. ध्वनी आधारीत सेवांपेक्षा दूरसंचार कंपन्यांची मोबाईलवरील इंटरनेटसमर्थ डेटा सेवांमधून सध्या कमाई अधिक आहे. या क्षेत्रातील नफाक्षमतेचे मुख्य परिमाण म्हणजे प्रति ग्राहक सरासरी प्राप्ति ज्यात लुप नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे.