24 November 2017

News Flash

एअरटेल-तिकोना व्यवहारात ‘जिओ’कडून खोडा!

अंबानींच्या कीर्तीला हातभार

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: May 18, 2017 1:59 AM

( संग्रहीत छायाचित्र )

सरकारला २१७ कोटींचा महसुली फटका बसण्याचा दावा

स्पर्धक भारती एअरटेलकडून प्रस्तावित तिकोना नेटवर्क्‍सच्या व्यवसायाचे अधिग्रहण हे सरकारी महसुलाच्या २१७ कोटी रुपयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरेल, असा दावा नवागत रिलायन्स जिओने रीतसर लेखी तक्रारीद्वारे केला असून, दूरसंचार विभागाने या एकत्रीकरणाला मंजुरी न देण्याची मागणी केली आहे.

तिकोनाने इंटरनेट सेवा पुरवठादार मिळविलेल्या वायूलहरींचा (स्पेक्ट्रम) वापर, या कंपनीवर ताबा मिळवून एअरटेलकडून व्हॉइस कॉल्स करण्यासाठी केला जाईल. हे नियमबाह्य़ असून, सरकारी महसुलासाठीही नुकसानकारक आहे, अशी भूमिका जिओने दूरसंचार विभागाला दिलेल्या तीन पानी पत्रातून स्पष्ट केली आहे.

एअरटेल जोवर तिकोनाकडे असलेल्या बीडब्ल्यूए अथवा ब्रॉडबॅण्ड परवान्याचे वायूलहरींचा वापर कोणत्याही कारणासाठी करण्याची मुभा देणाऱ्या एकीकृत परवान्यांत रूपांतरित करून घ्यावे आणि त्याच्याशी संलग्न शुल्क भरल्यानंतरच या अधिग्रहण व्यवहाराला मंजुरी दिली जावी अथवा जिओने २०१३ सालात याच प्रकारच्या रूपांतरणासाठी भरलेले १,६५८ कोटी रुपयांचे शुल्क सरकारने परत करावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारच्या परवाना वापराचे शुल्क वेगवेगळे असून, नियमबाह्य़ गैरवापराऐवजी एअरटेल दोन शुल्कातील तफावतीची २१७ कोटी रुपयांची रक्कम भरावी, अशी जिओची भूमिका आहे.

सर्व सहभागींना समान न्याय व समान व्यवसायाची संधी या दूरसंचार विभागाने घालून दिलेल्या तत्त्वाचे पालन करण्याच्या दृष्टीने आपली मागणी न्यायोचितच ठरेल, असा दावा जिओच्या प्रवक्त्यांनी केला. भारती एअरटेलच्या प्रवक्त्यांनी मात्र जिओचे हे दावे धुडकावून लावत, निकोप स्पर्धेला पायबंदाचा आणखी एक खोडसाळ प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व नियामक दिशानिर्देशांचे पालन करूनच एअरटेलने आजवर व्यवसाय केला आणि पुढेही तो सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. एअरटेलने मार्चमध्ये १,६०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात, तिकोना नेटवर्क्‍सच्या ५ परिमंडळातील ४ जी व्यवसायासह ब्रॉडबॅण्ड वायूलहरी परवान्यांवर ताबा मिळवत असल्याचे जाहीर केले आहे.

जिओच्या यशाचा अंबानींच्या कीर्तीला हातभार

मुंबई : जगातील सर्वात वेगाने विस्तारलेला नवउद्यम म्हणून ‘रिलायन्स जिओ’ या दूरसंचार सेवेने दर्जा मिळविला असून, हीच बाब रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कीर्तीत भर घालणारी ठरली आहे. फोर्ब्सच्या दुसऱ्या वार्षिक जागतिक नवप्रणेत्यांच्या (गेम चेंजर्स) २५ निष्णात व्यावसायिकांच्या सूचीत मुकेश अंबानी यांनी अग्रस्थान मिळविले आहे. भारतातील कोटय़वधी जनसामान्यांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहचविण्यात जिओच्या योगदानाची या बहुमानासाठी दखल घेतली गेली आहे.  शिवाय जागतिक दूरसंचार उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी ‘हॉल ऑफ फेम २०१७’ या बहुमानासाठी अंबानी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. नेटफ्लिक्सचे संस्थापक रीड हेस्टिंग्ज, कॉमकास्ट केबलचे टोनी वेर्नर आणि नेटवर्किंग इनोव्हेटर निक मॅक किओन या विद्यमान अन्य कीर्तिवानांच्या पंक्तीत अंबानी यांनी स्थान मिळविले आहे.

 

First Published on May 18, 2017 1:59 am

Web Title: bharti airtel reliance jio tikona digital networks