आजच्या घडीला एकंदर १५,००० कोटींची उलाढाल असलेल्या कम्पोझिट उद्योगात भारताला प्रचंड मोठी संधी असून, आगामी पाच वर्षांत हा उद्योग वार्षिक १५ टक्क्यांच्या वृद्धीदराने प्रगती साधून मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मितीलाही हातभार लावू शकेल, असा विश्वास या उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘फायबर रिइन्फोस्र्ड प्लास्टिक (एफआरपी) इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष सुभाष विठ्ठलदास यांनी व्यक्त केला.
आजच्या घडीला रिइन्फोस्र्डप्लास्टिक सामग्री अर्थात  कम्पोझिट्सचा उपयोग हा जवळपास सर्वच उद्योगात केला जातो. टिकाऊ, ऊर्जाबचतीस मदतकारक आणि पर्यावरणस्नेही असलेल्या कम्पोझिट्सना जर सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून इच्छित पाठबळ मिळाले, तर हा उद्योग देशातील  मोठय़ा रोजगार मिळवून देण्यातही पुढाकार घेईल, असे विठ्ठलदास यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.  मुंबईतील गोरेगावस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात येत्या ४ ते ६ एप्रिल २०१३ दरम्यान आयोजित होत असलेल्या ‘आयसीईआरपी २०१३’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेच्या घोषणेकरिता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होतो.
आजच्या घडीला प्रत्येक १०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कम्पोझिट्स निर्मिती केंद्रामध्ये सरासरी ६०० कर्मचारी काम करतात. पुढील पाच वर्षांत १५ टक्के वार्षिक दराने हा उद्योग प्रगती करीत गेल्यास ७० ते ७५ हजार इतका नवीन रोजगार यातून निर्माण होईल, असे विठ्ठलदास यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या घडीला कम्पोझिट्सचा वापर हा वाहन उद्योग, संरक्षण दलासाठी रणगाडे (टँक्स), वाहतूक, पवनऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात होत असून, आगामी वाढीचा अंदाज याच क्षेत्रातील वाढती मागणी गृहित धरूनच केला गेला आहे, असे ‘आयसीईआरपी २०१३ प्रदर्शना’चे अध्यक्ष प्रदीप ठक्कर यांनी स्पष्ट केले. जागतिक उत्पादनात भारताचा हिस्सा जवळपास ३ टक्के असून उल्लेखनीय बाब म्हणजे चीनमधील सद्य उत्पादनाच्या ते जवळपास ३३ टक्के आहे. सरकारकडून पाठबळ लाभल्यास जागतिक बाजारपेठेत चीनलाही पिछाडीवर टाकण्याची धमक भारतीय उद्योगांत असल्याचा दावा ठक्कर यांनी केला.

कम्पोझिट्सविषयक जागृतीसाठी सरकारच्या पाठबळाची गरज
स्टील, लाकूड, अ‍ॅल्युमिनियम आणि क्राँकिट या पारंपरिक सामग्रीला उत्तम व सर्वागाने किफायती पर्याय असलेला कम्पोझिट उद्योग भारतात ५० वर्षांपासून कार्यरत असून, भारतातील उत्पादन जवळपास ३ लाख टन पातळीवरच मर्यादित आहे. लाकूड, धातूपेक्षा शक्ती व वजन गुणोत्तरात सवरेत्कृष्ट असण्याबरोबरच, घर्षण रोध, गंज तसेच इलेक्ट्रिक इन्सुलेशन रहित असल्याने कम्पोझिट्स टिकाऊही आहेत. परंतु या उद्योगाबाबत व त्यांच्या उत्पादनांबाबत ना जागृती ना जाणीव अशी दुर्दैवाने सध्याची स्थिती असल्याची खंत ‘आयसीईआरपी २०१३’ परिषद समितीचे अध्यक्ष आणि मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी रजिस्ट्रार प्रा. डॉ. एम. ए, शेणॉय यांनी व्यक्त केली. सरकारकडून अन्य तंत्रज्ञानप्रवण व रोजगारक्षम उद्योगांना जशा सवलती दिल्या जातात तशा सवलतींबाबत या उद्योगाला लक्षात घेतले जात नाही. कम्पोझिट्सचे नवनवे वापर आणि पारंपरिक सामग्रीला पर्याय म्हणून पुढे येणाऱ्या उत्पादनांबाबत अधिकाधिक माहितीच्या प्रसारणासाठी तसेच प्रशिक्षित मनुष्यबळासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात कम्पोझिट्सविषयक प्रशिक्षणक्रमाची भर घालण्याबाबत तरी सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी डॉ. शेणॉय यांनी मागणी केली.