15 October 2019

News Flash

व्यापार युद्धाचे सावट गहिरे..

गडगडणाऱ्या सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजची घसरण सर्वाधिक राहिली.

‘सेन्सेक्स’ची २०१९ मधील सर्वात मोठी आपटी

मुंबई : अमेरिका-चीन दरम्यानच्या व्यापारयुद्धाच्या सावटाखाली निर्देशांक घसरण तूर्त तरी थंडावण्याचे नाव घेत नाही. बुधवारी प्रमुख निर्देशांकांनी एकाच व्यवहारात जवळपास सव्वा टक्क्याची घसरण नोंदवत, वर्ष २०१९ मधील सर्वात मोठी आपटी राखली. सेन्सेक्स तसेच निफ्टी सलग तीन व्यवहारांत ३ टक्के गडगडले आहेत.

अमेरिकेने लागू केलेल्या चिनी वस्तूंवरील २०० अब्ज डॉलरच्या कर वाढीवर बुधवारी अधिक तीव्र प्रतिक्रिया देताना सेन्सेक्स तब्बल ४८७.५० अंश घसरणीसह ३७,७८९.१३ पर्यंत, तर १३८.४५ अंश आपटीने निफ्टी ११,३५९.४५ वर येऊन स्थिरावला. या मोठय़ा घसरणीने सेन्सेक्सने बुधवारी ३८ हजाराचा स्तरही सोडला. तर निफ्टी ११,३५० च्या काठावर आहे.

अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा कायम असून बुधवारी त्याची मात्रा वाढताना दिसली. घसरता रुपया, कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल, सावरते खनिज तेल यांचाही परिणाम बाजारातील व्यवहारांवर जाणवला. त्यातच रोखे, सोने, आशियाई चलनातील व्यापाराबाबतही चिंता दिसून येत आहे.

गडगडणाऱ्या सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजची घसरण सर्वाधिक राहिली. त्याचे मूल्य ३.३५ टक्क्यांनी रोडावले. त्याचबरोबर बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, स्टेट बँक, वेदांता, एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँक, सन फार्मा, एनटीपीसी, येस बँक, इंडसइंड बँक आदींचे मूल्यही घसरले. एशियन पेंट्स, टीसीएस, एचसीएल टेक अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारात सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक घसरते राहिले. त्यातही ऊर्जा, स्थावर मालमत्ता, तेल व वायू, वित्त, बँक, आरोग्यनिगा, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक, २.५१ टक्क्यांपर्यंत घसरले. प्रमुख निर्देशांकांच्या पडझडीत मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप हे छोटय़ा गुंतवणूकदारांचे आवडते निर्देशांकही १.२१ टक्क्यांपर्यंत घसरले.

अमेरिकी बाजारातही चिंतायुक्त पडझड

चीनवर लागू केलेल्या शुल्कवाढीच्या जागतिक महासत्तेच्या निर्णयाने खुद्द अमेरिकी भांडवली बाजारातही चिंता व्यक्त केली गेली. मंगळवार व्यवहार अखेर डाऊ जोन्स निर्देशांक १.८ टक्क्याने, एस अँड पी ५०० निर्देशांक १.७ टक्क्याने, तर नॅसडॅक निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला. बुधवारी आशियातील अनेक निर्देशांक सव्वा टक्क्यांपर्यंत घसरले. युरोपीय बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात मात्र संमिश्र राहिली.

First Published on May 9, 2019 2:09 am

Web Title: biggest fall of the sensex in 2019