बिर्ला सन लाइफची ‘सिक्युअर प्लस’ योजना
विमाधारकांना खात्रीशीर मिळकतीचा दुसरा स्रोत (वार्षिक हप्त्याच्या रकमेच्या दुप्पट) मिळवून देऊ शकणारी पारंपरिक विमा योजना ‘बीएसएलआय सिक्युअर प्लस’ या नावाने बिर्ला सन लाइन इन्शुरन्स लि. या खासगी विमा कंपनीने मंगळवारी प्रस्तुत केली आहे.
‘सिक्युअर प्लस’ योजनेतील भरलेल्या हप्त्याच्या दुप्पट उत्पन्न कमावण्याची संधी असल्याने, विमाधारकांना निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्टे गाठता येण्याबरोबरच जीवन सुरक्षेची हमीही मिळते, असे या योजनेची अद्वितीय वैशिष्टय़े बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पंकज राजदान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.
सिक्युअर प्लस विमा योजनेत प्रवेशाचे किमान वय पाच वर्षे निश्चित करण्यात आले आहे. पॉलिसीच्या मुदतपूर्तीसमयी विमाधारकांना दोन उत्पन्न पर्याय दिले जातात. ज्यात पॉलिसी काळात भरलेल्या विमा हप्त्याची दुपटीने परतफेड मिळविता येते. जसे विमाधारकाने पॉलिसीच्या १२ वर्षे मुदतकाळात वार्षिक १ लाख रुपये या प्रमाणे हप्ता भरला असल्यास, त्याला पुढची सहा वर्षे म्हणजे १३ व्या वर्षी १ लाख, १४ व्या वर्षी २ लाख असे करीत १८ व्या वर्षी सहा लाख पॉलिसीवर उत्पन्न मिळविण्याचा पर्याय स्वीकारता येईल अथवा दुसऱ्या पर्यायात पुढची १२ वर्षे (१४ व्या वर्षांपासून सुरुवात करीत) दरसाल २ लाख रुपये निश्चित परतावा मिळविता येईल. या दोन्ही पर्यायांतील परतावा हा करमुक्त स्वरूपाचा असेल, अशी राजदान यांनी पुस्ती जोडली.
पॉलिसीकाळात विमाधारकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित वारसाला परतावा उत्पन्न निवडलेल्या पर्यायाप्रमाणे मिळेल. शिवाय पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू लाभाचीही तरतूद असून, वारसाला हमी रकमेच्या दुप्पट लाभ अशा स्थितीत दिला जाईल.

वाढीचा टक्का एकेरी आकडय़ाचाच!
मुंबई : नव्या आर्थिक वर्षांतही विमा व्यवसाय फारसा आशादायी नसल्याचे बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सने नवीन पॉलिसींबाबत टक्केवारीत एकेरी आकडय़ातच व्यक्त केलेल्या वाढीतून स्पष्ट होते. चालू आर्थिक वर्षांत मार्च २०१७ अखेर जीवन विम्यातील वाढीचा टक्का एकेरी आकडय़ातील अपेक्षिला आहे; मात्र वैयक्तिक प्रीमियम उत्पन्न हे १३ ते १४ टक्के असेल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी पंकज राजदान यांनी मंगळवारी येथे सांगितले. खासगी जीवन विमा क्षेत्रात ७.७ टक्के बाजारहिस्सा असलेल्या आदित्य बिर्ला समूहातील बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सने २०१५-१६ मध्ये ५,७०० कोटी रुपयांचे एकूण प्रीमियम उत्पन्न मिळविले आहे. चालू आर्थिक वर्षांत युलिप योजनेची गती ४० टक्क्यांपर्यंत राहील, असेही या वेळी सांगण्यात आले.