केंद्राचा दक्षतेचा इशारा

बिटकॉइन म्हणजे फसव्या ‘पॉन्झी’ योजनाच असल्याचे स्पष्ट करत गुंतवणूकदारांनी या आभासी चलनाद्वारे होणाऱ्या व्यवहारांपासून दूर राहावे, असे आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी केले.

बिटकॉइनसारख्या आभासी चलनाला कोणतीही वैधता तसेच संरक्षण नाही, असे स्पष्ट करत अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात त्यातील गुंतवणूक ही जोखमेची असल्याचे म्हटले आहे. या संबंधाने समितीचा अहवाल सरकारच्या विचाराधीन असल्याचेही सांगण्यात आले होते. आभासी चलन हे डिजिटल, इलेक्ट्रॉनिक माध्यमात साठविले जाते; तेव्हा सायबर हल्ला, पासवर्ड हरविणे आदींद्वारे गुंतवणूकदार हा कष्टाने कमावलेला पैसा गमावू शकतो.

केंद्रीय अर्थ खात्यांतर्गत येणाऱ्या आर्थिक व्यवहार विभागाने बिटकॉइनकरिता विद्यमान जागतिक नियमन आणि विधि प्रारूपाच्या अभ्यासासाठी एक आंतर समिती नियुक्त करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मूल्य तेजीने चर्चेत आल्यानंतर बिटकॉइनबाबत रिझव्‍‌र्ह बँकेनेही सावधगिरीचा इशारा दिला होता. अशा चलनावर तसेच त्यामार्फत होणाऱ्या व्यवहारांवर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.