देशातील आर्थिक परिस्थितींबद्दल मागील काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच आजचा दिवस शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांनी २.१२ लाख कोटी रुपये गमावले. अमेरिकन शेअर बाजारात झालेली घसरण, देशातील आर्थिक परिस्थितीबद्दल सुरु असलेल्या चर्चा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी बाजार उघडल्यानंतर शेअर्सची विक्री करण्यावर भर दिला. याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स ६६५ अंकांनी कोसळला तर निफ्टीही १७० अंकांनी गडगडला. सर्वच आघाडीच्या कंपन्यांचे शेअर्स गडगडल्याचे चित्र शेअर बाजारात दिसले. टीसीएस, आयटीसी, एचडीएफसी, रिलायन्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये जोरदार घसरण पहायला मिळाली.

सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी बाजारातील व्यवहार सुरु झाले तेव्हा सेन्सेक्स ६२५.९३ अंकांनी कोसळून ३८ हजार ३६५.०१ वर स्थिरावला. तर निफ्टी १७०.४० अंकांनी कोसळला. १.४८ टक्के फटका बसल्यानंतर निफ्टी ११ हजार ३५७.०५ अंकांवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भांडवली मूल्य १५४.८५ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. गुरूवारी बाजार बंद होताना हे मूल्य १५६.८६ लाख कोटी रुपये इतके होते.

३० शेअर्स पॅक सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय़ बँकेला सर्वाधिक फटका बसला. बँकेचे शेअर्स २.९९ टक्क्यांनी पडले आणि ३७१.३० रुपयांवर स्थिरावले. त्या खालोखाल एनएसईवर एसबीआय, कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स उणे ०.९१ टक्क्यांनी, अ‍ॅक्सेस बँकेचे शेअर्स उणे १.९८ टक्क्यांनी इंडसइंड बँक उणे ०.९३ टक्क्यांनी गडगडले. टाटा स्टील्सलाही मोठा फटका बसला. सर्व कंपन्यांना फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या, आर्थिक विकासासंदर्भातील संभ्रमाचे वातावरण यामुळे भविष्यातही अशाप्रकारचा फटका बसण्याची भीती गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकन शेअर बाजारामध्ये पाच टक्क्यांची घसरण झाल्याने त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आलं. अमेरिकन शेअर बाजारामध्ये जूननंतर ही सर्वात मोठी घसरण आहे. अमेरिकन शेअर बाजारीतील अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, टेस्ला या मोठ्या कंपन्यानाही चांगलाच फटका बसला आहे. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाल्याचे दिसून आलं. जपानी शेअर मार्केटमध्ये १.६ टक्क्यांची घट दिसून आली. एप्रिलनंतर जपानी शेअर बाजाराला बसलेला हा सर्वात मोठा फटका आहे. हाँगकाँग शेअर बाजार १.८ टक्क्यांनी तर ऑस्ट्रेलियन शेअर बाजार २.८ टक्क्यांनी घसरला.