सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी पासपोर्ट हा मोबाईल सादर केला आहे. कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल लालवानी यांनी सोमवारी त्याचे अनावरण नवी दिल्लीत केले.
४९,९९० रुपये किंमत असलेल्या पासपोर्टची विक्री येत्या १० ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. मात्र त्यासाठीची पूर्व नोंदणी अ‍ॅमेझोन या ई – कॉमर्स व्यासपीठावरून सोमवारपासूनच सुरू झाली. असे करणाऱ्या धारकाला ५ हजार रुपयांच्या भेटवस्तूची जोड मिळणार आहे. ४.५ एलसीडी टच स्क्रीन असलेल्या या मोबाईलची अंतर्गत क्षमता ३२ जीबी आहे तर कॅमेरा १३ व २ मेगा पिक्सल आहे.
बहुचर्चित आयफोन५एस, सोनीचा एक्सपेरिया झेड३, एचटीसीचा एम८ अशांबरोबर पासपोर्ट स्पर्धा करेल. कंपनीचा यापूर्वीचा महागडा फोन ४५ हजार रुपयांचा क्यू१० होता. जून २०१४ नंतर त्याची किंमत आता १९ हजारांवर आली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेत आपला बाजारहिस्सा कायम राखण्यासाठी ब्लॅकबेरीने उत्पादनांच्या किंमती खाली आणल्या.