पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात १०० स्मार्ट शहरे निर्माण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पदच आहे, अशा शब्दात संयुक्त राष्ट्राचे शहरे आणि वातावरणातील बदलाविषयक विशेष दूत आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकल आर. ब्लूमबर्ग यांनी त्याचे कौतुक केले. आपल्या भारत दौऱ्यात त्यांनी मंगळवारी मुंबईच्या महापौर आणि आयुक्तांचीही भेट घेतली.
भारताला दुसऱ्यांदा देत असलेल्या भेटीदरम्यान प्रगतीच्या दिसत असलेल्या दृश्य खुणा पाहत असताना आपल्याला खूपच आनंद होत असल्याचे ब्लूमबर्ग यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘भारतातील सद्य शहरीकरणाचा वेग थक्क करणाराच आहे. २०३० सालापर्यंत जवळपास ६० कोटी भारतीय शहरांमध्ये वास्तव्यास असतील. नव्या धाटणीच्या शाश्वत शहरांमध्ये जितकी अधिकाधिक गुंतवणूक होईल तितक्या आर्थिक प्रगतीसही हातभार लागेल, याची पंतप्रधान मोदी यांना जाणीव आहे आणि त्यासाठी त्यांनी स्मार्ट शहरांच्या उभारणीवर भर दिला आहे.’
ब्लूमबर्ग म्हणाले, ‘अजून उर्वरित जगाने दखल घेतली नसली, तरी पर्यावरण बदल आटोक्यात आणण्यासाठी होणाऱ्या जागतिक प्रयत्नांच्या नेतृत्वपदी भारत निश्चितच पोहोचला आहे.’ पर्यावरण संवर्धन, शहरीकरण व आर्थिक विकास या गोष्टी परस्परांविरुद्ध नसून एकमेकांना पूरकच आहेत, या कल्पनेला मोदी यांनीच पुढे आणून संयुक्त राष्ट्राचा दूत म्हणून आपले काम सोपेच केले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
जगातील सर्वात मोठा लोकशाही आणि सर्वाधिक तरुणांचा देश असलेल्या भारतातील निम्मी लोकसंख्या २५ वष्रे वयाच्या आतील आहे. ही पिढी, जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते आणि लक्षावधी लोकांना दारिद्रय़ातून मुक्त करू शकते, असे नमूद करीत त्यांनी भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले.

रस्ते सुरक्षा अभियानात मुंबई १० जागतिक शहरांच्या पंक्तीत
ब्लूमबर्ग यांनी मंगळवारी मुंबई महानगरपालिकेत महापौर स्नेहल आंबेकर आणि आयुक्तसीताराम कुंटे यांचीही भेट घेतली. त्यांनी या भेटीत मुंबईसारख्या बडय़ा शहरातील रस्ते अपघाताच्या समस्येवर चर्चा करताना आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांच्या संस्थेने सुरू केलेल्या ब्लूमबर्ग जागतिक रस्ते सुरक्षा अभियानात इतर १० शहरांबरोबर मुंबईला समाविष्ट करीत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘मी न्यूयॉर्कचा महापौर असताना रस्ते सुरक्षा हा सार्वजनिक सुरक्षेचा एक अविभाज्य घटक होता. आणि रस्त्यावर होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या संख्येत घट आणण्यात आम्हाला लक्षणीय यश मिळाले होते. आम्ही काही पावले उचलली, जसे की – पादचारी सुरक्षेसाठी चौकांची नव्याने आखणी करणे – हे मुंबईतही यशस्वी होऊ शकेल.’’ त्यांची संस्था रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये काम करते. मद्यपान करून गाडी चालवणे, धोकादायक रस्त्यांमध्ये सुधारणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक परिवहनाला प्रोत्साहन देणे या विषयांवर ती लक्ष देते.

सौर ऊर्जेवरील भर स्तुत्य!
भारतातील ऊर्जानिर्मितीतील सध्या एक टक्क्याहूनही कमी असलेल्या सौर ऊर्जेचे प्रमाण २०२२ पर्यंत १० टक्क्यांहून अधिक वाढले पाहिजे. ज्या लक्षावधी भारतीय लोकांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही, त्यांना वीज पुरवठा करणे, हे आणखी एक ध्येय यामागे आहे. खरे तर, पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य असे आहे की विजेपासून वंचित असलेल्या प्रत्येक घरात सौर ऊर्जा पटलांचे वितरण करायचे. हे अत्यंत कठीण काम आहे. पण जर यात यश मिळाले तर हे प्रारूप जगातील अन्य देशांना मार्गदर्शक ठरेल. विकसनशील देश अस्वच्छ ऊर्जानिर्मिती टाळून थेट स्वच्छ ऊर्जानिर्मितीकडे, जसे की सौर ऊर्जेकडे वळू शकतात, हे सिद्ध करणारे ते पाऊल ठरेल. केवळ पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यालाच याचा फायदा होणार नसून, पारेषण तारांचे जाळे उभारण्यासाठी लागणारे अब्जावधी डॉलर्सही वाचणार आहेत.