‘बीएनपी पारिबा फोकस्ड २५ फंड’ ही बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाची नवीन योजना २९ सप्टेंबपर्यंत गुंतवणुकीस खुली आहे. यानिमित्ताने गुंतवणुकीचे व्यवस्थापन पाहण्याचा १७ वर्षांचा अनुभव असलेले  आनंद शहा यांच्याशी केलेली बातचीत. शहा हे बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुंतवणूक प्रमुख आहेत.

बीएनपी पारिबा फोकस्ड २५ फंडाच्या रूपाने तुम्ही ९ वर्षांनतर इक्विटी फंड घेऊन येत आहात. नवीन फंड आणण्यास इतका विलंब का लागला?

– केवळ मालमत्ता वाढविणे हा आमचा उद्देश नाही. मालमत्ता वाढण्यासोबत गुंतवणूकदारांनी संपत्ती निर्मिती करावी हे आमचे धोरण आहे. बाजार जरी गुंतवणुकीसाठी अनुरूप असला तरी गुंतवणूकदारांची मानसिकता नव्याने गुंतवणूक करण्याची असते असे नव्हे. सध्या मोठय़ा प्रमाणावर गुंतवणुकीचा ओघ वळू लागल्याने अनुकूलततेच्या जोडीला समभाग गुंतवणुकीची, पर्यायाने जोखीम स्वीकारून परतावा मिळण्याची मानसिकता तयार होत असल्याने नवीन इक्विटी योजना आणण्यासाठी योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते.

बीएनपी पारिबा फोकस्ड २५ फंडही संकल्पना काय आहे?

– अर्थव्यवस्थेत अर्थचक्राच्या आवर्तनानुसार किंवा दिशेप्रमाणे उद्योग क्षेत्रातील नेमक्या उद्योगांना फायदा होत असतो. तसा काही क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत असतो. या फंडाच्या गुंतवणुकीत आम्ही अशा उद्योगांचा समावेश करणार आहोत ज्या उद्योगांचा वृद्धिदर देशाच्या अर्थव्यवस्था वाढीच्या वृद्धिदरापेक्षा अधिक असेल आणि या उद्योगातील अशा कंपन्यांचा समावेश असेल ज्या कंपन्या त्या उद्योग क्षेत्राच्या वृद्धिदरांपेक्षा अधिक जोमाने वाढ नोंदवतील. विस्तृतपणे सांगायचे तर बँकिंग क्षेत्रातील ज्या बँकांचे वैयक्तिक कर्जदारांना कर्जवाटप आहे अशा बँका कंपन्यांना कर्जवाटप किंवा वेगवेगळ्या प्रकल्पांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांपेक्षा अधिक जोमाने वाढत आहेत. त्याचप्रमाणे वैयक्तिक वापराच्या वस्तूंपैकी टूथपेस्ट, केसांची निगा राखणारी तेले, वैयक्तिक निगा राखणाऱ्या वस्तूंपैकी सर्वच वस्तूंचा वृद्धिदर समान नाही. आमचे गुंतवणुकीचे हेच तत्त्व आहे. आम्ही नेमके असेच समभाग निवडू ज्यात आज उत्सर्जन (अर्निग पर शेअर) वाढत आहे किंवा ज्या समभागांचा अर्थगती बदलाचा थेट संबंध आहे.

० देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत नेमकेपणाने काय भाष्य करता येईल?

– अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीची काळजी घेणारे वित्तीय तूट, महागाई वगैरे घटक समतोल राखून असले तरी निश्चलनीकरणामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा संथ झाल्याचे आपण अनुभवत आहोत. कृषी कर्जमाफी, सातवा वेतन आयोग लागू होणे, गृहकर्ज व्याजावर अनुदाने यांचा परिणाम २०१८ ते २०२० दरम्यान नक्कीच जाणवेल. सरकार आपल्याकडून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्नशील असले तरी उत्सर्जनातील वृद्धी अजून किमान दोन तिमाही तरी दूर आहे असे वाटते.

० कंपन्यांच्या मिळकतीत / उत्सर्जनात वाढ होण्यास विलंब होत आहे आणि निर्देशांक नवीन शिखराकडे आहेत. अशा परिस्थितीत फंडात गुंतवणूक करण्यात धोका आहे काय?

– म्युच्युअल फंडांच्या योजनांसोबत उच्च धनसंपदा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाची पीएमएस सेवा देत आहोत. जे आम्ही आमच्या पीएमएस खातेधारकांना देत आहोत ते म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना देण्यास आमच्यावर एक प्रकारच्या मर्यादा आहेत. आम्ही या फंडाच्या माध्यमातून एक समभागकेंद्रित जोखीम स्वीकारून अव्वल परतावा देणारा फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहोत. हे धोरण नक्की केल्यानंतर आम्ही त्या त्या उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या कंपन्यांतून गुंतवणूक करण्याचे आमचे धोरण आहे. गुंतवणूक करताना आमच्यासाठी ज्या भावात आम्ही गुंतवणूक करतो ते मूल्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहेच. हे करतानाच ज्या कंपन्या वृद्धिदरात सातत्य राखतील. अर्थगतीच्या गती बदलाचा फायदा असलेल्या क्षेत्रातील असतील यावर आमचा भर असेल, जेणेकरून गुंतवणूक मूल्य कमी होण्याची जोखीम आम्ही कमी करू शकू.