‘आयआरएफसी’साठी बिग बी, खानत्रयी, कपूर भगिनींची मागणी
मनोरंजन कंपन्या, ई-कॉमर्स, क्रीडा क्षेत्र अथवा किरकोळ विक्री दालनासारख्या व्यवसायात मोठय़ा पडद्यावरील अभिनेते-अभिनेत्रींची गुंतवणूक नित्याचीच. मात्र भांडवली बाजारात येणाऱ्या व्याज करमुक्त रोखे विक्रीतही या क्षेत्रातील व्यक्तींनी सढळ हाताने सहभाग नोंदविला आहे.
गेल्याच आठवडय़ात झालेल्या भारतीय रेल्वे आर्थिक मंडळाच्या (आयआरएफसी) ४,५३२ कोटी रुपयांच्या रोख्यांकरिता तिकिट बारीवर १०० कोटी रुपयांचा गल्ला मिळविणाऱ्या खानत्रयी तसेच बिग बी ते करिना-करिष्मा भगिनी यांनीही मागणी नोंदविली.
व्याज करमुक्त असलेल्या रोख्यांकरिता एरवी सामान्य गुंतवणूकदारांना असलेल्या ओढय़ाची यंदा बॉलिवूड तारकांनाही भुरळ पडल्याचे यातून दिसून आले. परिणामी आयआरएफसी रोख्यांना पहिल्या तासाभरात अडीच पट मागणी नोंदविली गेली.
आठ दिवस खुली असणाऱ्या आयआरएफसीच्या व्याज करमुक्त रोख्यांकरिता विक्री पुरवठय़ांपेक्षा मागणी अधिक आल्याने पहिल्या तासाभरातच आवरती घ्यावी लागली. ४,५३२ कोटींच्या रोख्यांसाठी पहिल्या तासाभरात गुंतवणूकदारांनी १०,००० कोटींची मागणी नोंदविली.
ही मागणी नोंदविणाऱ्या गुंतवणूकदारांच्या यादीत सलमान खान, शाहरुख खान, आमीरखान (१० कोटी), करिना (२० कोटी) व करिष्मा (५ कोटी) कपूर भगिनी, अमिताभ बच्चन, सफआली खान (४० कोटी) अक्षयकुमार व त्याची पत्नी टिं्वकल खन्ना यांचा समावेश आहे.
उद्योग जगतातील, बजाज समूहातून अध्यक्ष राहुल बजाज यांच्यासह शेखर बजाज, मधुर बजाज व नीरज बजाज, एचडीएफसीचे दीपक पारेख व केकी मिस्त्री यांनी व एचडीएफसी म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापकीय संचालक मििलद बर्वे यांच्याकडून या व्याज करमुक्त रोख्यांसाठी मोठय़ा रकमेची मागणी नोंदली गेली असल्याचे या रोख्यांच्या विक्रीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दलाली पेढीने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘या रोख्यांवर या मंडळींना २० वर्षांसाठी ७.५० टक्के कर मुक्तव्याज मिळणार आहे. ही वलयांकित मंडळी ३० टक्के कर कक्षेत असल्याने या गुंतवणुकीवर उत्सर्जनाचा दर ११.५३ टक्के होतो. तेव्हा या मंडळींना या गुंतवणूक पर्यायाची भुरळ पडणे रास्तच आहे,’ असे या तारकांच्या बाजारातील सहभागकृतीचे समर्थन सनदी लेखापाल प्रवीण देशपांडे यांनी केले.
‘माझ्या गुंतवणुकीत स्थिर उत्पन्न देणाऱ्या रोख्यांना नेहमीच स्थान देता आले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीफ) हा सर्वोत्तम पर्याय असला तरी त्यामध्ये १.५० लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक करता येत नाही. तर मुदत ठेवी या कर नियोजनाच्या दृष्टीने कुचकामी ठरत असल्याने माझी ‘पीपीफ’नंतर दुसरी पसंती ही व्याज करमुक्त असलेल्या रोख्यांनाच असते. चालू आíथक वर्षांत मी २ लाखांचे करमुक्त रोखे जमा करणार आहे,’ असे खाजगी बँकेत अधिकारी असलेल्या कल्पना वटकर यांनी सांगितले.
‘या वर्षांत एनटीपीसी, आरईसी, व पीएफसी या तीनही व्याज करमुक्त असलेल्या रोख्यांच्या विक्रीला एका लाखांचे रोखे विकत घेण्यासाठी मी अर्ज केला होता; परंतु मला पाच किंवा दहा हजारांचेच रोखे मिळाले. मी माझे दोन लाखाचे व्याज दर करमुक्त असलेले रोखे जमा करू शकेन की नाही या विषयी मला शंका आहे, असेही वटकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘मी माझ्या अशीलांना नेहमीच करमुक्त रोख्यांत गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. परंतु पुरवठय़ापेक्षा मागणी वाढल्याने अर्जाच्या रक्कमेच्या १० टक्के देखील रोखे मिळत नाहीत.’
गुंतवणूक सल्लागार जयंत विद्वांस यांनी सांगितले की, माझ्या उच्च धन संपदा बाळगणाऱ्या अशिलांनी एक ते पाच कोटींपर्यंत अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक, डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे. हे रोखे २० वष्रे मुदतीचे असले तरी राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदले जाणार असल्याने या रोख्यांना अव्वल रोकड सुलभता आहे.
‘एका वर्षांपूर्वी विक्री केलेल्या एनटीपीसीच्या रोख्याचे व्यवहार रोखे मंचावर अधिमुल्याने सुरु आहेत. १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेले रोख आज १,२०० ते १,२२० रुपये दरम्यान उपलब्ध आहे’, असे म्युच्युअल फंड व आíथक उत्पादन नयन जोगले यांनी सांगितले.
या रोख्यांसाठी सर्वात मोठा मागणी अर्ज स्टेट बँकेने २,५०० कोटीचा केला असून अन्य अर्जदारांमध्ये विप्रो, येस बँक, अॅक्सिस बँक, रिलायंस इंडस्ट्रीज, इन्फोसिस, बॉश, बजाज ऑटो, टाटा कन्सल्टसी सíव्हसेस यांचा समावेश आहे.