महागाई दरात आणखी घसरणीचे अर्थविश्लेषकांचे कयास आणि त्या परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात लवकरच कपातीच्या शक्यतेने रोखे बाजाराला तेजीत आणले. गुरुवारी १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा परतावा हा १७ महिन्यांच्या नीचांकाला ७.८६ टक्क्यांवर ओसरला. जुलै २०१३ नंतर परतावा दरात दिसलेला हा निम्न स्तर आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोखे व्यवहार प्रणालीवर जुलै २०२४ मध्ये मुदतीपूर्ती असलेल्या रोख्यांचे (जीसेक) व्यवहार गुरुवारी सकाळी ३ अंशांच्या घसरणीसह ७.८८ टक्के पातळीवर सुरू झाले आणि ते दिवसभराच्या व्यवहारात आणखी २ अंशांनी ओसरले.
चालू तिमाहीत १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परतावा तब्बल ०.६३ टक्क्यांनी ओसरला आहे. नोव्हेंबर महिन्यातील ग्राहक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक शुक्रवारी जाहीर होणार असून, तो आधीच्या वर्षांतील नोव्हेंबरच्या तुलनेत ४.४ टक्के अशी माफक वाढ दर्शविणारा असेल, असे विश्लेषकांचे कयास आहेत. विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या घसरणीने देशांतर्गत इंधनाच्या किमतीतील उतार महागाईच्या चिंतेबाबत मोठा दिलासा ठरला आहे. तेलाच्या किमती आणखी घसरण्याची भाकिते पाहता, महागाईच्या प्रश्नापासून निर्णायक मोकळीक मिळण्याचे संकेत विश्लेषक देत आहेत.