तेजीवर स्वार झालेला भांडवली बाजाराला लवकरच वास्तवतेचे भान येईल, अशी प्रतिक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. बाजाराच्या हालचालींवर आपली बारीक नजर असून आर्थिक स्थैर्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांना पाहता रिझव्‍‌र्ह बँक गरज पडेल तशी योग्य ती पावले टाकेल, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

जागतिक अर्थव्यवस्थेतील विपुल रोकडसुलभता बाजारातील उत्साहाला कारणीभूत असली तरी सध्या बाजार आणि अर्थव्यवस्था यांच्यातील सहसंबंध नाहीसा झाल्याचे दिसते. भविष्यात हा सहसंबंध जुळेल आणि बाजाराला वास्तवाचे भान येईल, असे दास यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

कर्जहप्ता स्थगिती ३१ ऑगस्टला संपत असून रिझव्‍‌र्ह बँकेने कंपनी आणि वैयक्तिक कर्जाच्या एक वेळच्या पुनर्रचनेला परवानगी दिली आहे. सर्व बँका ३१ ऑगस्टपर्यंत पुनर्रचनेचे निकष निश्चित करून येणारे प्रस्ताव मंजूर करतील, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. कर्ज पुनर्रचनेचा कोणाला फायदा होईल याचा निर्णय बँका घेतील, असेही ते पुढे म्हणाले.

रिझव्‍‌र्ह बँकेने ३ ऑगस्टला काढलेल्या अधिसूचनेद्वारे कर्ज पुनर्रचनेस पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांची व्याख्या केली आहे. जे कर्ज खाते १ मार्च २०२० रोजी प्रमाण श्रेणीत होते त्यांना या पुनर्रचनेचा लाभ मिळू शकेल. यापूर्वी जाहीर केलेली के. व्ही कामत तज्ज्ञ समिती कर्ज पुनर्रचनेचे निकष आणि पुनर्रचनेपश्चात वित्तीय बाबींची शिफारसी करेल, अशी माहिती दास यांनी दिली.