अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने आर्थिक उपाययोजनेच्या रूपात पतधोरण स्थिर ठेवल्यानंतर जपाननेही अचानक अर्थसाहाय्याबाबत पुढाकार घेतल्याने येथील गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दुणावला. या निर्णयाचे स्वागत मोठय़ा वधारणेने होताना सेन्सेक्स एकदम ५०० अंशांनी झेपावला, तर निफ्टीने थेट ८,३०० ला गवसणी घातली.
अवघ्या एकाच व्यवहारात ऐतिहासिक विक्रम मोडीत काढणारा सेन्सेक्स दिवसअखेर ५१९.५० अंशवाढीने २७,८९४.३२ वर, तर १५३ अंश वधारणेने निफ्टी ८,३२२.२० पर्यंत गेला. व्यवहारात सेन्सेक्स २७,९०० पर्यंत, तर निफ्टी ८,३३० पर्यंत गेला होता. सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकांनी उच्चांकी स्तर राखला.
दोन्ही प्रमुख निर्देशांक गुरुवारी, ८ सप्टेंबर रोजीच्या टप्प्यापुढे गेले होतेच. ते सप्ताहअखेर अधिक उंचावले. गुरुवारच्या ऐतिहासिक टप्प्यानंतर सेन्सेक्सची सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात तेजीनेच झाली. व्यवहारात निर्देशांकाने २७,८९४.३२ पर्यंत मजल मारली.
एकाच व्यवहारातील मोठय़ा निर्देशांकवाढीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता १.५० लाख कोटी रुपयांनी रुंदावली. तर सलग चार सत्रांतील मुंबई निर्देशांकाची भर आता १,००० अंशांच्या वर गेली आहे. निफ्टीकडूनही ८,३०० चा अनोखा टप्पा पार केला गेला.
मुंबई शेअर बाजाराच्या दफ्तरी तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, क्षेत्रातील समभागांना वाढीव मूल्य मिळाले. भांडवली वस्तू निर्देशांक सर्वाधिक २.६ टक्क्य़ांनी वाढला. मिड-कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.२ व ०.९ टक्क्य़ांनी उंचावले.
सेन्सेक्समध्ये केवळ भारती एअरटेलच नकारात्मक प्रवास करणारा समभाग ठरला. एचडीएफसी, गेल, एल अ‍ॅण्ड टी, टाटा पॉवर असे इतर सारे २९ समभागांचे मूल्य उंचावले, तर ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक वगळता इतर सर्व ११ ही क्षेत्रीय निर्देशांक वधारणीच्या यादीत राहिले.
मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध प्रत्येक १० समभागांमागे सहावा समभाग वधारलेला राहिला. सेन्सेक्समधील अनेक समभागांनी त्यांच्या महिन्यातील, तर काहींनी दोन महिन्यांतील सर्वोच्च मूल्याला स्पर्श केला. टाटा स्टीलने महिन्यातील उच्चांकाला, तर एचडीएफसीने दोन महिन्यांतील वरच्या टप्प्याला गाठले.
२९ ऑक्टोबरअखेर सेन्सेक्स वर्षभरात २९ टक्क्य़ांनी उंचावला आहे, तर शुक्रवारची मुंबई निर्देशांकातील झेप ही जून २०१४ नंतरची सर्वात मोठी ठरली आहे. भांडवली बाजारातील विक्रमी तेजीला स्थानिक कंपन्यांच्या वाढत्या फायद्यातील निकालाबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत असलेल्या कच्च्या तेलाच्या दराचाही मोठा पाठिंबा मिळत आहे.
३० हजारांचे लक्ष्य मार्च २०१५ पूर्वीच?
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर भांडवली बाजाराचा दीर्घ काळच्या तेजीकडे वेगाने प्रवास सुरू असतानाच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकाच्या भविष्यातील वाटचालींचे अंदाज बांधले जात आहे. प्रमुख दलाली पेढय़ा, बाजार विश्लेषकांनी आता आर्थिक सुधारणांच्या जोरावर सेन्सेक्सकडून ३० हजारांचा पल्ला मार्च २०१५ पूर्वीच गाठला जाईल, असे म्हटले आहे. यापूर्वी पुढील दिवाळीपर्यंत या कळसाचे कयास केले जात होते. पण ही उंची त्यापूर्वीच म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पापर्यंत गाठली जाण्याचा मानस जोर पकडतो आहे.
जपानने नेमके काय केले?
आशियाई भागातील प्रमुख देश म्हणून जपान ओळखला जातो. जपानने अनपेक्षितपणे गुरुवारी उशिरा आर्थिक उपाययोजनांचा कार्यक्रम जाहीर केला. याअंतर्गत त्या देशाच्या बँक ऑफ जपान या मध्यवर्ती बँकेने सरकारी रोखे खरेदीचा आकार ३० लाख कोटी येनने वाढवत तो ८० लाख कोटी येन प्रति वर्षवर नेऊन ठेवला. याचे स्वागत जपानसह (निक्केई +४.६%) एकूणच आशियाई बाजारातही निर्देशांकवाढीने झाले.
अमेरिकेचे काय होते?
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हची दोन दिवसांची पतधोरण बैठक गुरुवारी संपली. त्यात विद्यमान स्तरावरील शून्य टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अमेरिकेने गुरुवारी जारी केलेल्या आर्थिक आढाव्याचाही परिणाम दिसून आला. जून ते सप्टेंबर २०१४ मध्ये जागतिक महासत्तेने तब्बल ३.५ टक्के अर्थविकासातील वेग नोंदविला आहे. अमेरिकेतील वाढत्या रोजगाराच्या आकडेवारीनेही अर्थव्यवस्थेत विश्वास वाढविला आहे.