भारताच्या दक्षिणेत ३०० रुपयांपासून तीन लाख रुपयांपर्यंतच्या साडय़ांचेअग्रणी विक्रेते असलेल्या साई सिल्क्स (कलामंदिर) लिमिटेड या कंपनीने प्रारंभिक भागविक्रीद्वारे ८९ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. लक्षणीय म्हणजे भागविक्री (आयपीओ) प्रक्रियेत हात पोळलेल्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी संरक्षक ‘सेबी’ने संकल्पिलेली ‘सेफ्टी नेट स्कीम’चा या भागविक्रीने स्वेच्छेने स्वीकार करण्याबरोबरच, व्यक्तिगत सामान्य निवासी गुंतवणूकदारांसाठी ५५ टक्के समभाग राखीव ठेवले गेले आहेत. विदेशात ‘सॅप’च्या सेवेतून भारतात परतलेले चलावडी नागा कनकदुर्गा प्रसाद आणि त्यांची पत्नी झांसी राणी यांनी मेव्हणे कल्याण श्रीनिवासन यांच्या साथीने साई सिल्क्सची स्थापना केली. आजच्या घडीला कलामंदिर, वरमहालक्ष्मी आणि मंदिर या प्रमुख ब्रॅण्ड्स अंतर्गत आंध्रप्रदेश व तामिळनाडूतील विविध १६ विक्री दालनांमधून उंची रेशमी साडय़ांसह महिला, बाल आणि पुरुष वस्त्रप्रावरणांची ही कंपनी अग्रेसर विक्रेता मानली जाते. गेल्या काही वर्षांत कंपनीने प्रति वर्ष सरासरी २७ टक्के दराने महसुली प्रगती साधली आहे. कंपनीने प्रस्तावित केलेल्या या बुक-बिल्डिंग प्रक्रियेच्या भागविक्रीसाठी प्रति समभाग रु. ७० ते रु. ७५ असा किमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. ११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान या भागविक्री प्रक्रियेत गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.

‘सुरक्षा जाळी’ काय आहे?
अवास्तव किमतीला भागविक्री उरकून प्रत्यक्षात शेअर बाजारात कंपनीचा समभाग सूचिबद्ध झाल्यावर भाव आपटल्याचा कटू अनुभव गेले दोनेक वर्षे गुंतवणूकदार अनुभवत आहेत. या प्रवृत्तीला प्रतिबंध म्हणून आणि प्राथमिक बाजारपेठेबाबत पुन्हा विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी ‘सेबी’ने ‘सेफ्टी नेट स्कीम’ची संकल्पना ‘सेबी’ने पुढे आणली. या योजनेअंतर्गत भागविक्रीतील शेअर गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा झाल्यापासून सहा महिन्यांच्या काळात केव्हाही शेअर्सचा भाव हा भागविक्रीच्या वेळच्या भावापेक्षा कमी झाले तर समभाग वितरीत करणारी कंपनी अर्थात प्रवर्तकांनी प्रति गुंतवणूकदार कमाल १००० शेअर्स हे भागविक्रीच्या भावाला खरेदी करून त्यांचे नुकसान भरून काढले पाहिजे. सेबीने ही योजना अद्याप सक्तीची केलेली नाही. तथापि गेल्या सहा महिन्यांत असा पर्याय स्वेच्छेने स्वीकारणारी साई सिल्क्स ही केवळ भागविक्री घेऊन येणारी दुसरी कंपनी आहे.