देशातील प्रत्येक तीन पैकी दोन कर्जदार हे त्यांच्या कर्जविषयक पात्रतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पतगुणांक अर्थात “सिबिल स्कोर”विषयी फारसे सजग नाहीत, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
कर्जविषयक पात्रतेच्या बँकांकडून पाहिल्या जाणाऱ्या अनेक निकषांमध्ये सिबिल पतगुणांक एक महत्वाचा निकष आहे.
होम क्रेडिट इंडिया या बँकेत्तर वित्तीय कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ६८ टक्के सहभागींना सिबिलच्या पतगुणांकाविषयी माहिती नसल्याचे आढळून आले.
सर्वेक्षणात सहभागी या मंडळींना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कर्ज घेतलेले असतानाही, त्यांना सिबिल पतगुणांक आणि त्याचे महत्त्व याची जाणीव नसल्याचे दिसते.
देशस्तरावरील या सरासरीच्या तुलनेत, पाटण्यामध्ये अवघ्या २२ टक्के कर्जदारांना, तर कोलकातामध्ये २५ टक्के कर्जदार आणि उल्लेखनीय म्हणजे मुंबईसारख्या जागतिक वित्तीय केंद्र म्हणून लौकिक असलेल्या महानगरांतही देशाच्या सरासरीच्या तुलनेत किती तरी कमी म्हणजे केवळ २५ टक्के कर्जदार हे सिबिल पतगुणाकांविषयी माहिती राखतात, असे या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
लोकांमधील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण जोखण्यासाठी होम क्रेडिट इंडियाने हे सर्वेक्षण देशातील सात शहरांमध्ये सुमारे एक हजार कर्जदारांमध्ये केले.
महिलांमधील आर्थिक निरक्षरतेचे प्रमाण तुलनेने खूपच जास्त असल्याचे याबाबतच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
व्याजाच्या टक्काबाबत अनभिज्ञ!
पतगुणांकांविषयी अनभिज्ञतेबरोबरच, सर्वेक्षणात ७६ टक्के कर्जदारांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा दर किती, याचे उत्तरही माहितीअभावी देता आलेले नाही. कुटुंबाच्या खर्च-उत्पन्नाचा मेळ जुळविताना, महिन्याकाठी पडणाऱ्या कर्जाचा हप्ता अर्थात ईएमआय याचीच लोकांना फिकीर असते. दिल्लीमधील १७ टक्के, जयपूरमधील १९ टक्के आणि सर्वाधिक मुंबईतील २४ टक्के कर्जदारांनाच त्यांच्या कर्जावरील व्याजाचा टक्का माहित असल्याचे दिसून आले. बँकेचे पासबुक आणि त्यावरील तपशील समजतो, असे मात्र ९५ टक्के लोकांनी सांगितले. या व्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खाते यातील फरक समजणारे ८० टक्के सापडले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:29 am