फेडीसाठी वाढीव दोन महिन्यांची मुभाव्यापार

निश्लनीकरण प्रक्रियेत नोटा बदल तसेच रक्कम काढण्यासाठी तासनतास रांगेत ताटकणाऱ्यांना रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी काहीसा दिलासा दिला. विशेषत: गृहादी कर्ज असलेल्यांना त्यांचे मासिक हप्ते पुढील ६० दिवसांपर्यंत भरण्याची मुभा या खास वर्गाला दिली. यामुळे एक कोटी रुपयेपर्यंत गृह, वाहन, शेती तसेच अन्य कर्ज असलेल्यांना १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबपर्यंत दरम्यान देय असलेल्यांना पुढील दोन महिन्यांचा विस्तारित कालावधी मिळाला आहे. सार्वजनिक, खासगी, विदेशी व्यापारी बँका तसेच बिगर बँकिंग वित्त कंपन्या यांनाही ही मात्रा लागू करण्यात आली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गेल्या महिन्यातील पाव टक्का दर कपातीनंतर बँकांकडे निश्चलनीकरणाच्या माध्यमातून निधी ओघ वाढल्यामुळे काही बँकांनी त्यांचे कर्ज व्याजदर ०.२५ टक्क्य़ांपर्यंत गेल्या आठवडय़ापासून कमी केले आहेत. त्यातच आता हा ६० दिवसांचा मासिक हप्ता देय अवधी मिळाल्याने तमाम कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

बिगर बँकिंग वित्त कंपन्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. निश्चलनीकरण कालावधीत कर्जदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निश्चलनीकरणानंतर कर्जदारांना त्यांचे मासिक हप्ते फेडण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेली मुभा बँका तसेच बिगर बँकिंग वित्त कंपन्यांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे अनेक छोटय़ा कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

हर्षिल मेहता, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीएचएफएल.