मुंबई शेअर बाजाराच्या ‘बीएसई- एसएमई’मंचावरील आजवरची सर्वात मोठी म्हणजे १२.२१ कोटींचे भांडवल उभारणी करणारी भागविक्री मुंबईस्थित बोथरा मेटल्स अ‍ॅण्ड अ‍ॅलॉय लिमिटेडने आणली आहे. बीएसई-एसएमई मंचावर सूचिबद्ध होत असलेली ही चौदावी कंपनी असून, ही भागविक्री येत्या १२ मार्च ते १४ मार्च या दरम्यान प्रति समभाग २५ रु. या निश्चित दराने होत आहे.
बोथरा मेटल्सचा भागविक्रीचा ५० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असून, किमान अर्ज ६००० समभागांसाठी आणि त्यापुढे त्या पटीत करता येईल. भागविक्रीपश्चात कंपनीतील प्रवर्तकांचे भागभांडवल ७३.६ टक्के इतके सौम्य होणार आहे. महाराष्ट्रात सांगली, तसेच भावनगर (गुजरात) आणि कालांब (हिमाचल प्रदेश) येथे अ‍ॅल्युमिनियम एक्स्ट्रुझन्सची निर्मिती करणारे कंपनीचे तीन प्रकल्प कार्यरत आहेत.
कंपनीने अलिकडेच सांगली प्रकल्पात ९,००० मेट्रिक टनाची उत्पादन क्षमतेत भर घालणारी विस्तार प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यामुळे कंपनीची उत्पादनक्षमता सध्याच्या तुलनेत तिपटीने वाढून वार्षिक १५ हजार मेट्रिक टनांवर गेली असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरलाल बोथरा यांनी सांगितले. यातून सध्याच्या घडीला या क्षेत्रातील बोथरा मेटल्स ही सर्वाधिक विक्री उलाढाल असलेली देशातील सर्वात मोठी कंपनी बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या उत्पादनांना बांधकाम उद्योग, वाहन उद्योगातून वाढती मागणी असून, ती पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमतेत विस्तार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.