महाराष्ट्र निर्विवादपणे देशातील औद्योगिकदृष्टय़ा अग्रेसर राज्य आहे. परंतु गुजरातसारखी ब्रॅण्ड प्रतिमा राज्याला तयार करता आली नाही. तसा आता सुरू झालेला प्रयत्न म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण, पण तेही नसे थोडके, असे प्रतिपादन सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी केले.
उद्यमशील सृजनशीलता ओळखून नव-उद्योजकतेच्या जोपासनेत आणि संवर्धनात बँकांचीच भूमिका महत्त्वाची असल्याचे ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले. प्रभादेवी येथील सारस्वत बँक भवन येथे आयोजित समारंभात त्यांच्या हस्ते ‘मॅक्सेल अ‍ॅवार्ड २०१२ कॉफी टेबलबुक’चे प्रकाशन झाले. कुठल्याही व्यापार-व्यवसायात चढ-उतार हे येतच असतात. पण त्या प्रासंगिक अपयशाचा बाऊ करणे आणि उद्योग आपले काम नाही, असे आप्तेष्टांकडून टोमणे मारले जाणे वाईटच.  अशा वेळी बँकाही तारण नाही म्हणून सावकारासारख्या वागताना दिसतात, अशी खंतही ठाकूर यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
अमेरिकेत बहुतांश सेवा उद्योगात गुजराती, कच्छी मंडळी आहेत. पण तांत्रिक कौशल्य, अवजड उद्योगात मराठी उद्योजक पुढे आहेत. भारतात पारदर्शकता, प्रांजळपणा व सचोटी या उद्योजकांच्या अंगभूत गुणांना फारशी किंमत नाही, पण अमेरिकेमध्ये या गुणांना प्राधान्य दिले जाते, असे प्रतिपादन अमेरिकेत स्थायिक उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुनील देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना केले.