भांडवली बाजारात सलग सहा दिवस अविरत सुरू असलेल्या निर्देशांक-वाढीला गुरुवारी खंड पडला. जागतिक स्तरावर नरमलेली बाजार तेजी तसेच नफारूपी विक्रीचा स्थानिक बाजारावर ताण दिसला. विक्रीचा मुख्यत: फटका खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागांना बसला.

गुरुवारी बाजारातील व्यवहारांचा कल अनिश्चित धाटणीचा होता, ५९९ अंशांचा हेलकावा घेत सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत १२८.८४ अंश घसरणीसह ३३,९८०.७० वर दिवसअखेर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ३२.४५ अंश घसरणीसह १०,०२९.१० पातळीवर बंद झाला.

कर्जदारांना हप्ते स्थगितीसह व्याजमाफीही दिली जावी, यासाठी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्रालयास बाजू मांडण्यास सांगितले आहे. याचा नकारात्मक ताण बँकांच्या समभाग मू्ल्यावर दिसून आला. व्याजमाफी देणे आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरणार नाही, या रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेचा न्यायालयाने घेतलेल्या समाचाराचाही बाजार-व्यवहारांवर विपरित परिणाम दिसून आला. अर्थात मागील सहा दिवसांतील व्यवहारात ज्या गतीने निर्देशांक झेपावले आहेत, ते पाहता तेजीवाल्यांनी श्वास घेण्यासाठी थोडी उसंत घेणे स्वाभाविकच आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधनप्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले. थोडा सबुरीचा पवित्रा तर काही प्रसंगी नफा पदरी बांधून घेणारी विक्री यामुळेही निर्देशांक घसरल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक भांडवली बाजारातील व्यवहारही थांबा आणि वाट पाहा याच धाटणीचे होते. युरोपीय मध्यवर्ती बँकेकडून करोनाच्या पार्श्वभूूमीवर अर्थप्रोत्साहक मदतीची घोषणा होणार असून, या मदतीचे प्रमाण काय असेल, याबद्दल जगभरात गुंतवणूकदार वर्गात उत्सुकता आहे. या संबंधाने सावधगिरी म्हणून युरोपातील बहुतांश बाजाराची सुरुवात ही घसरणीनेच झाली. दरम्यान खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय वायदा किमती (ब्रेन्ट क्रूड) १.२१ टक्क्य़ांनी नरमून प्रति पिंप ३९.३१ डॉलरवर होत्या. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन रुपया १० पैशांनी घसरत ७५.५७ पातळीवर होता.

रिलायन्स पुन्हा १० लाख कोटींवर

मुंबई :  हक्कभाग विक्रीच्या यशस्वी पूर्ततेसह रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने गुरुवारी १० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची गाठली. हक्कभाग विक्रीला मिळालेल्या यशामुळे समभाग गुरुवारच्या व्यवहारात २.४ टक्के वाढीसह १,५७९.९५ पातळीवर होता. या समभाग मूल्यवृद्धीमुळे कंपनीचे बाजार भांडवल मुंबई शेअर बाजारावर १०.०१ लाख कोटी रुपयांवर गेले. त्यामुळे ११ मे २०२० रोजी गमावलेला हा अनोखा टप्पा रिलायन्सने पुन्हा सर केला आहे. कंपनीने भारतातील आजवरची सर्वात मोठी ५३,१२४ कोटी रुपयांची उभारणी करणारी हक्कभाग विक्री गुंतवणूकदारांकडून अतिरिक्त भरणा होऊन पूर्ण केली आहे.