विदेशी गुंतवणूकदारांसाठी चिंताजनक बनलेल्या पूर्वलक्ष प्रभावाने लागू करावयाच्या किमान पर्यायी कर (मॅट) बाबत उच्चस्तरित समिती नेमण्याच्या दिलाश्यानंतर दुसरा सुखद धक्का सरकारतर्फे देण्यात आला आहे. भांडवली बाजारातील तेजीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या या वर्गाला करण्यात येणारा नवा कर तगादा तूर्त जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा हायसे वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांना नव्याने कोणतीही कर मागणीची नोटीस बजाविली जाणार नाही तसेच त्यांना पुन्हा काही देय आहे, असे सांगितले जाणार नाही, असे सरकारने सोमवारी स्पष्ट केले. याबाबत केंद्रीय अर्थ खात्याने सोमवारी पत्रक जारी केले. हे पत्रक प्राप्तीकर खात्याच्या आंतरराष्ट्रीय कर विभागाला पाठविताना याबाबत समिती नियुक्त करण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले.
भांडवली बाजारातील व्यवहारामार्फत होणाऱ्या नफ्यावर कर आकारणी करण्याच्या लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या निर्णयामुळे गेले महिनाभर विदेशी गुंतवणूकदारांवर टांगती तलवार होती. कर तगाद्यामुळे या गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये भांडवली बाजारात जोरदार विक्री करत सेन्सेक्सला तब्बल ९०० अंश घसरण नोंदविण्यास भाग पाडले होते.
गेल्याच आठवडय़ात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी अशा कराबाबत उच्चस्तरिय समिती नेमण्याचे जाहीर केले होते. यानुसार निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. शाह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. शाह हे कायदा विभागाचेही अध्यक्ष आहेत. तसेच याबाबतच्या समितीत करविषयक अन्य अधिकारी, तज्ज्ञही असणार आहेत. ३,००० हून अधिक संख्या असलेल्या विदेशी गुंतवणूकदारांवर गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये ४० हजार कोटी रुपयांहून अधिक कर देय असल्याचे सरकारने यापूर्वी म्हटले होते. विदेशी गुंतवणूकदारांना होणाऱ्या भांडवली नफ्यापोटी २० टक्के कर आकारणीचा सरकारचा सुरुवातीचा प्रस्ताव होता. त्यातही आशियातील दोन प्रमुख देशांतील गुंतवणूकदारांना कोणताही कर आकारू नये, अशी सूचनाही नंतर पुढे आली होती. कर विभागाने यापूर्वीच ६८ विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना ६०२ कोटी रुपयांच्या कर मागणीसाठी नोटीस बजाविली होती.
केंद्रीय महसूल सचिव श्रीकांता दास यांनी शुक्रवारी कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. शाह यांची याबाबत भेट घेतली. दरम्यान या कराबाबतचे प्रकरण मुंबई उच्च व सर्वोच्च न्यायालयातही गेले आहे.