ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे की बाहेर पडावे अर्थात गुरुवारच्या ‘ब्रेग्झिट’ सार्वमताचे पडसाद म्हणून रुपयाच्या विनिमय मूल्यात तसेच भांडवली बाजारात पडझडीची शक्यता लक्षात घेता, रिझव्‍‌र्ह बँक आणि सेबी या दोन नियामक यंत्रणांकडून कडक दक्षता बाळगण्यात आली आहे. बाजारात पुरेशी तरलता राहील यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ब्रिटनमधील सार्वमताचा कौल काय येईल याबाबतच्या अनिश्चितेतून आधीच वित्तीय बाजारात तणावाची स्थिती आहे. जागतिक बाजारात गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. भारतावरील पडसादासंबंधाने शक्यता लक्षात घेऊन, प्रामुख्याने तरलतापूरक स्थितीसाठी आवश्यक ती पावले टाकली गेली आहेत, असे रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
भारताचे ब्रिटन तसेच २८ राष्ट्रांच्या युरोपीय महासंघ दोहोंशी महत्त्वाचे व्यापार संबंध आहेत. युरोपात देशात लक्षणीय स्वरूपात गुंतवणूक येत असते. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षा जॅनेट येलेन यांनी मंगळवारी केलेल्या विधानानुसार, ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल आल्यास, जगाला त्याचे विपरीत आर्थिक परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे गुरुवारच्या सार्वमताच्या कौलाबाबत भारतातील अर्थ व उद्योगजगत तसेच गुंतवणूकदारांनाही उत्कंठा आहे.
दरम्यान भांडवली बाजार नियंत्रक सेबीनेही ‘ब्रेग्झिट’च्या शक्यतेच्या दृष्टीने सज्जता केली असल्याचे म्हटले आहे. स्थानिक भांडवली बाजाराचा देखरेख आणि जोखीम व्यवस्थापनाचा ढाचा पुरता सक्षम असून, तो कोणत्याही बाजूने कौल आल्यास उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचा दावा सेबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. भयंकर पडझडीच्या स्थितीतून अनवस्था प्रसंग निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिटन जर युरोपीय महासंघातून बाहेर पडला तर स्थानिक भांडवली बाजारात तेथील गुंतवणूकदारांचा निधी मोठय़ा प्रमाणात काढून घेतला जाईल, अशी भीती वर्तविली गेली आहे. तथापि बाजारातील अस्थिरतेच्या स्थितीचा फायदा घेऊ पाहणाऱ्या सट्टेबाजांवर करडी नजर राहील.

आमिषांना भुलू नका..
दलाल, पोर्टफोलियो व्यवस्थापक आणि अन्य बाजार मध्यस्थांकडून छोटय़ा गुंतवणूकदारांना विशेषत: बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या तसेच निर्देशांकांच्या फ्युचर्स व ऑप्शन्स व्यवहारांतून मोठय़ा लाभाचे बेगडी आमिष दाखविले जाण्याची शक्यता आहे. असे कोणते प्रयत्न सुरू आहेत काय, यावर ‘सेबी’ची करडी नजर असेल, असे सूत्रांनी सांगितले.