20 October 2020

News Flash

‘ब्रेग्झिट’ मतदानपूर्व चाचण्यांचा कौल अस्पष्ट

ब्रिटनने युरोपीय संघात राहावे की त्यातून बाहेर पडावे, यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी

ब्रिटनने युरोपीय संघात राहण्याचे पारडे जनमत चाचणीत जड

ब्रिटनने युरोपीय संघात राहावे की त्यातून बाहेर पडावे, यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (२३ जून) ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात येणार असून त्यापूर्वीच्या जनमत चाचण्यांच्या निकालातून चित्र पुरेसे स्पष्ट झालेले नाही. युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने किंचित बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रिटनची २८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन युनियनमधून संभाव्य एक्झिट म्हणजेच ‘ब्रेग्झिट’ हा केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जगासाठी कळीचा मुद्दा बनला आहे. प्रत्यक्ष मतदानाला केवळ दोनच दिवस उरलेले असूनही ब्रिटिश जनमताचा अद्याप स्पष्ट अंदाज येत नसल्याने वातावरणातील उत्कंठा आणखीनच वाढली आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने जनमत अधिक प्रबळ बनत चालल्याचे चित्र होते. पण संघात राहण्याच्या बाजूने असलेल्या उत्तर ब्रिटनमधील महिला खासदार जो कॉक्स यांची गेल्या गुरुवारी गोळ्या झाडून व भोसकून हत्या करण्यात आल्यानंतर जनमत थोडेसे ब्रिटनने युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने वळत असल्याचे मतदानपूर्व चाचण्यांतून दिसत आहे.
‘ओआरबी’ने मंगळवारी ‘द डेली टेलिग्राफ’साठी केलेल्या मतदानपूर्व जनमत चाचणीत संघात राहण्याच्या बाजूने ५३ टक्के तर बाहेर पडण्याच्या बाजूने ४६ टक्के मते दिल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वीच्या चाचणीच्या तुलनेत संघात राहण्याच्या बाजूच्या मतदानात ५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तर विरोधी मतांत ३ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. ‘नॅटसेन’ या सामाजिक संशोधन संस्थेने केलेल्या पाहणीत संघात राहण्याच्या बाजूने ५३ टक्के तर बाहेर पडण्याच्या बाजूने ४७ टक्के मते व्यक्त झाली. १६ मे ते १२ जून या काळात ही पाहणी करण्यात आली.
ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि जॉन मेजर यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल हे ब्रिटनने युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आता सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रांतून अनेक प्रसिद्ध व्यक्ती पुढे येत आहेत. त्यात ब्रिटनचा फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम याचीही भर पडली आहे. आपल्या पुढील पिढय़ांच्या भल्यासाठी ब्रिटनने जगाला भेडसावत असलेल्या प्रश्नांना एकटय़ाने सामोरे जाण्यापेक्षा एकत्रितपणे त्यांचा मुकाबला करणेच योग्य आहे, असे बेकहॅमने म्हटले. ‘यूगव्ह’ने ‘द टाइम्स’साठी केलेल्या ऑनलाइन पाहणीत सामील झालेल्या ४४ टक्के नागरिकांनी संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने मत नोंदवले.
वादाचे मुद्दे काय?
युरोपीय संघात कायम राहिल्याने युरोपीय संघाचे मुख्यालय असलेल्या ब्रसेल्सकडे अधिक नियंत्रण जात असल्याचे बाहेर पडण्याच्या बाजूने असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. तर ब्रिटन बाहेर पडला तर ब्रिटनच्याच नव्हे तर युरोपच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होईल, युरोपीय संघातील दुसऱ्या क्रमांकाचा आर्थिक आणि लष्करीदृष्टय़ा ताकदवान देश बाहेर पडेल, अन्य देशांमध्येही हे लोण पसरून युरोपीय संघच संपुष्टात येईल आणि खुद्द ब्रिटनमध्ये स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याची मागणी उचल खाऊन जोर धरेल, अशी भीती संघात राहू इच्छिणारे नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2016 8:24 am

Web Title: brexit vote will change europe no matter the outcome
टॅग Arthsatta,Loksatta
Next Stories
1 भारतीय उद्योगक्षेत्राकडून आपत्कालिन सज्जतेची हाक
2 विमा दस्तांचे ‘डिजिटल रूपडे’ समजून घ्या!
3 बाजारात नफेखोरी
Just Now!
X