भारतासह आशियातील अन्य चार देशांना जोडणारी विकास बँक लवकरच अस्तित्वात येईल, असा आशावाद पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. याबाबतचा पाच देशांदरम्यान असलेला करारही प्रगतीपथावर असल्याचेही ते म्हणाले.
ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश ‘ब्रिक्स’ देश म्हणून ओळखले जातात. या देशांदरम्यान एक सामायिक बँक असावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरून केली गेली होती. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात हे पाच देश काही समान आव्हानांचा सामना करत असताना अशा प्रकारची एकच बँक आंतराराष्ट्रीय व्यवहारासाठी उपयोगी ठरेल, असाही आशावाद याबाबत निर्माण केला. सामायिक बँकेसाठी ‘ब्रिक्स’ देशांचे सहकार्य विविध स्तरावर सुरू असल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली. ‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेच्या व्यासपीठावरून संबोधित करताना ते म्हणाले की, भारत आणि ‘ब्रिक्स’मधील अन्य देशदेखील जागतिक आर्थिक बलाढय़ केंद्रे बनतील. ‘ब्रिक्स’साठीची सामायिक बँक स्थापन करण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत, असेही नमूद केले. आर्थिक अनिश्चिततेपोटी या देशांना भांडवली ओघाच्या व्यवस्थापनाचा सामना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले. डॉ. सिंग यावेळी म्हणाले की, मोठय़ा लोकसंख्येच्या देशांना चांगल्या राहणीमानासाठी शाश्वत आर्थिक धोरण राखण्याची गरज आहे. उद्योग विकासासाठी विकासाभिमुख पायाभूत सेवा क्षेत्राच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. समान विकासासाठी विश्वासार्ह संस्था उभारल्या जाव्यात.
महागाईवर नियंत्रण लवकरच
महागाईवर नियंत्रण मिळवण्यातही केंद्र सरकारला यश येईल असेही चिदम्बरम म्हणाले. वाढत्या महागाईला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न चालवले असून येत्या काही दिवसांतच त्याचे चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
रुपयाही स्थिरावेल
अस्थिरता आणि अंदाज यांमुळे रुपयाची स्थिरता अस्थिर झाली आहे. रुपयाच्या वाढत्या विनिमय दरास बाजारातील अस्थिरता आणि अंदाज हेच दोन मुद्दे अधिक कारणीभूत होते. मात्र, आता सरकारने योजलेल्या उपायांमुळे रुपया  स्थिरावेल असा विश्वासही चिदम्बरम यांनी व्यक्त केला.