‘ब्रिक्स’ देशांच्या १०० अब्ज डॉलर्स भांडवलाच्या आधारे आकाराला आलेल्या नव्या विकास बँकेचे कामकाज चीनमध्ये मंगळवारपासून सुरू झाले. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांना पर्याय म्हणून या बँकेकडे पाहिले जात आहे. ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’चे उद्घाटन चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाय येथे झाले त्यावेळी चीनचे अर्थमंत्री लाऊ जिवेई, शांघायचे महापौर यांग झियांग व बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत उपस्थित होते.
कामत हे पहिली पाच वर्षे अध्यक्ष असतील, नव्या बँकेच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असे कामत यांनी सांगितले. सर्व देश सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, आम्ही काळजीपूर्वकरीत्या सदस्यांच्या गरजा लक्षात घेऊन सेवा देऊ. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असून ही बँक रशियात उफा येथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या सातव्या परिषदेत स्थापन करण्यात आली होती. चीनचे अर्थमंत्री लाऊ यांनी सांगितले की, ही बँक आताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेला मदत करील, पायाभूत सुविधांसाठी ही बँक सदस्य देशांना मदत करील. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे आरंभीचे भांडवल ५० अब्ज असून ते पुढील दोन वर्षांत १०० अब्ज डॉलरवर जाईल.