ब्रिक्स देशांच्या गटाने एकमेकांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या राखीव परकीय चलनाच्या १०० अब्ज डॉलरच्या साठय़ात भारत १८ अब्ज डॉलर्स निधी देणार आहे. डॉलरच्या तरलतेची काही समस्या आली तर या निधीचा वापर केला जाईल, असे सांगण्यात आले.
ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांनी १०० अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी स्थापन करण्याचा करार केला असून त्यात चीनचा वाटा सर्वाधिक म्हणजे ४१ अब्ज डॉलर्स असणार आहे.
दक्षिण आफ्रिका या निधीसाठी ५ अब्ज डॉलर्स देणार असून ब्राझील व रशिया प्रत्येकी १८ अब्ज डॉलर्स देणार आहे.
ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांनी ७ जुलै २०१५ रोजी मॉस्कोत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यान्वये सदस्य देशांसाठी हा निधी तयार करण्यात आला आहे, असे रशियाच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.
हा निधी विम्यासारखा वापरला जाणार असून आयात-निर्यात समतोलात काही अडचणी आल्यास या निधीचा वापर करता येईल. हा निधी ३० जुलैपासून अस्तित्वात येईल. आर्थिक स्थिरता राखण्यासाठी सदस्य देशांना त्याचा उपयोग होईल.
२६ जूनला भारताचा परकीय चलनसाठा कमी झाला असून तो आता ३५५.२२१ अब्ज डॉलर्स इतका आहे. भारतीय बँकर के.व्ही.कामत हे या बँकेचे प्रमुख आहेत. ब्रिक्स देशांचा जागतिक उत्पन्नातील वाटा १६ ट्रिलियन असून जगातील लोकसंख्येच्या ४० टक्के लोक या देशात राहतात.
पहिल्या ब्रिक्स बँक अध्यक्षपदी भारताचे बँकर के. व्ही. कामथ यांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. येत्या महिन्यात ते पदभार घेतील.