देशातील मोठी बिस्किट उत्पादन करणारी कंपनी ब्रिटानियाला दुसऱ्या तिमाहीत ३०३ कोटी रूपयांचा नफा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटानियानं आर्थिक मंदीबाबत वक्तव्य केलं होतं. तसंच आर्थिक मंदीमुळे आपल्या उत्पादनांची किंमत वाढवावी लागणार असल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी पारले कंपनीलाही दुसऱ्या तिमाहीत नफा झाला होता. त्यांच्या नफ्यात १५.२ टक्क्यांची वाढ झाली होती.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ब्रिटानीया कंपनीच्या नफ्यात १६.०९ टक्क्यांची वाढ होऊन तो ३०३ कोटी रूपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीला २६१.०३ कोटी रूपयांचा नफा झाला होता. तर ब्रिटानिया कंपनीच्या एकूण उत्पन्नात १२.२२ टक्क्यांची वाढ होऊन ते २ हजार ९१३.५५ कोटी रूपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीला २ हजार ५९६.११ कोटी रूपयांचे एकूण उत्पन्न मिळालं होतं.

कंपनीनं सलग चौथ्या तिमाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे. कंपनीचा आपल्या ब्रँडमधील गुंतवणूक, ब्राँडची नवी ओळख, कंपनीला पूर्ण झालेली १०० वर्ष आणि ज्या ठिकाणी कमी पोहोचत होतो त्या ठिकाणी नेटवर्क वाढवल्यामुळं हे शक्य झालं असल्याचं मत, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वरूण बेरी यांनी सांगितलं.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बाजारात आर्थिक मंदी दिसत आहे. तर जानेवारी महिन्यापर्यंतचा कालावधी हा कठिण असेल. यामुळेच ऑक्टोबर महिन्यापासून उत्पादनांच्या किंमतीत वाढ करावी लागणार आहे, असं कंपनीचे मार्केट हेड सुब्रमण्यम यांनी सांगितलं होतं. कंपनीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि ती अर्ध्यावर आली आहे, असंही ते म्हणाले होते.