म्युच्युअल फंड वितरकांसाठीच्या मोबाइल अ‍ॅपचे अनावरण; ‘यूपीए पेमेंट’ सुविधाही सुरू होणार

मुंबई : दशकापूर्वी सुरू झालेल्या ‘बीएसई स्टार एमएफ’ मंचावर गेल्या वित्त वर्षांत १.९० लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले असल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी बुधवारी येथे दिली.

मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई स्टार एमएफ या म्युच्युअल फंड मंचाने बुधवारी एका समारंभात म्युच्युअल फंड वितरकांसाठी मोबाइल अ‍ॅप सादर केले. त्यावेळी ते बोलत होते.

म्युच्युअल फंड वितरक या अ‍ॅपच्या सहाय्याने म्युच्युअल फंड व्यवहाराची अंमलबजावणी करू शकतील. एसआयपी एसटीपी व्यतिरिक्त या अ‍ॅपच्या सहाय्याने व्हिडिओ केआयसी करण्याची सुवीध उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या समारंभाच्या निमित्ताने एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात चौहान यांनी सांगितले की, एकूण म्युच्युअल फंड गुंतवणुकीपैकी २५ टक्के गुंतवणूक या मंचावरून होते. नवीन गुंतवणूकदारांपैकी ४० टक्के गुंतवणूकदार या मंचाचा वापर करतात. या मंचाच्या वापरकर्त्यांची संख्या २५,००० पुढे गेली आहे. या मंचावरून भविष्यात यूपीए पेमेंट सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एल अ‍ॅँड टी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कुलकर्णी, मिरॅ असेट म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  स्वरूप मोहंती, स्तंभलेखिका मोनिका हलन आदी यावेळी उपस्थित होते.

सन २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या या मंचाने बुधवारी सादर केलेल्या अ‍ॅप सुविधेचा उपयोग आमच्या २५,००० वापरकत्यार्ंना म्युच्युअल फंड व्यवहार करण्यासाठी सहजतेने करता येईल, असा विश्वास बीएसई स्टार एमएफ या मंचाचे व्यवसाय प्रमुख किरण नांदवडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. या अ‍ॅपमुळे म्युच्युअल फंड वितरकांची कार्यक्षमता नक्कीच वाढेल. तसेच नवीन गुंतवणूकदारांची केवायसी प्रक्रिया सुलभतेने करता येईल, असेही ते म्हणाले.