भांडवली बाजाराचा तेजीसह विस्तारणारा प्रवास मंगळवारी नव्या ऐतिहासिक टप्प्याला गाठणारा ठरला. सलग चौथ्या व्यवहारातील तेजीमुळे एकाच दिवसात ५०० हून अधिक अंशांची झेप घेत सेन्सेक्स २८,८०० नजीक पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ८,७०० हा स्तर प्रथमच अनुभवला.
व्यवहारात २८,८२९.२९ पर्यंत मजल मारणाऱ्या मुंबई निर्देशांकाने दिवसअखेर सोमवारच्या तुलनेत ५२२.६६ अंश वाढ नोंदविली. तर सत्रात ८,७०७.९० पर्यंत पोहोचलेला निफ्टी दिवसअखेर १४४.९० अंश वाढीसह ८,६९५.६० वर राहिला. एकाच व्यवहारातील या अनोख्या प्रवासामुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही ८९ हजार कोटी रुपयांची भर पडली.
चीनमधील वाढते सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे, युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अपेक्षित अर्थसाहाय्य तर स्थानिक पातळीवर सरकारच्या भविष्यातील आर्थिक सुधारणा व रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत व्याजदर कपातीचा आणखी एक फेरा असा सारा संयोग मंगळवारी जुळून आला. याचा परिणाम दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी जवळपास दोन टक्क्यांच्या वाढीची कमाई केली.
गेल्या चार व्यवहारांतील मुंबई निर्देशांकाची वाढ तब्बल १,४३८ अंश राहिली आहे. सेन्सेक्सने यापूर्वीचा विक्रम २८ नोव्हेंबर २०१४ रोजी २८,६९३.९९ असा नोंदविला आहे. निफ्टीचा यापूर्वीचा सर्वोच्च स्तर ४ डिसेंबर रोजी नोंदला गेला आहे.
१०० कोटी रुपयांच्या पुढे असणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती मंगळवारी एकाच सत्रात तब्बल ८९,३७६ कोटी रुपयांनी उंचावली. त्यामुळे ती आता एकूण १,०२,२९,७२९ कोटी रुपये झाली आहे. शेअर बाजारातील १,५५२ समभाग वधारले.
कंपन्यांच्या तिमाही निकालातही नफावाढीचे चित्र दिसत असल्याचे गुंतवणूकदारांच्या मंगळवारच्या खरेदीच्या अनुभवावरून दिसले. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांचे मूल्य वाढले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे ०.४४ व ०.४१ टक्क्यांनी उंचावले.

पोलाद समभागांची मूल्य सरशी
चीनमधील राष्ट्रीय सकल उत्पादनात अपेक्षेच्या तुलनेत अधिक भर पडल्याने पोलाद निर्देशांकातील कंपन्यांचे भाव उंचावले. चीन हा भारताचा सर्वात मोठा पोलाद क्षेत्रातील ग्राहक देश आहे. यामुळे एकूण पोलाद निर्देशांकही ३ टक्क्यांनी वाढला. या क्षेत्रातील समभागांमध्ये ५.३ टक्क्यांपर्यंत झेप नोंदली गेली. सेसा स्टरलाइट, टाटा स्टील, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, एनएमडीसी, नाल्को, सेल, हिंदुस्तान झिंक यांच्या समभाग मूल्यात ०.७५ टक्क्यांवरील वाढ राखली गेली. तर दुसऱ्या स्थानावर १.८४ टक्क्यांसह बँक निर्देशांक राहिला.

१९९ समभागांना वार्षिक सर्वोत्तम मूल्य
सर्वोच्च टप्प्याला गवसणी घालणाऱ्या मुंबई शेअर बाजारात मंगळवारी १९९ समभागांना त्यांचे गेल्या वर्षभरातील सर्वोत्तम मूल्य प्राप्त झाले. यामध्ये सेन्सेक्समधील अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक या व्याजदराशी संबंधित समभागांचा समावेश राहिला. मुंबई शेअर बाजाराच्या उत्तुंग प्रवासात दखल घेतले गेलेल्या संभाव्य व्याजदर कपातीच्या आशेवर टाटा मोटर्स, व्हर्लपूल इंडिया या अप्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कंपन्यांचेही समभाग वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले. तर जवळपास २०० समभागांमध्ये स्पाइसजेट, माइंडट्री, एमआरएफ, एचटी मीडियांनीही वर्षांतील सर्वाधिक भाव मिळविला.

भांडवली बाजाराच्या सर्वोत्तम कामगिरीला नेमके कोणते एक कारण सांगता येणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताबाबतच्या आशावादी विकास अंदाजाकडेही दुर्लक्षून चालणार नाही. हीच बाब गुंतवणूकदारांनीही मंगळवारचे बाजारातील व्यवहार करताना हेरली.
जयंत मांगलिक, रेलिगेयर सिक्युरिटीज