सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी संमिश्र व्यवहार नोंदले गेले. केवळ १.३० अंश घसरणीने सेन्सेक्स २८,४४२.७१ वर बंद झाला; तर १२.९५ अंश वधारणेने निफ्टी अवघ्या ८,५३७.६५ पर्यंतच पोहोचू शकला.
सेन्सेक्सने व्यवहारात २८,५०० पुढचा प्रवास केला; मात्र अखेर तो या टप्प्यापासून दुरावला. सत्रात तर त्याचा e09तळ २८,३७०.७३ पर्यंत गेला होता. रिझव्‍‌र्ह बँकेने स्थिर व्याजदर ठेवल्याने नफेखोरीचा क्रम तिसऱ्या दिवशीही राहिला.
मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र मंगळवारप्रमाणेच तेजीत राहिले. दोन्ही निर्देशांकांमध्ये अनुक्रमे तुलनेत अधिक १.३९ व १.६४ टक्के वाढ झाली. वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, तेल व वायू, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभाग वधारले; तर माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार समभागांना कमी मागणी राहिली. घसरत्या डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान निर्देशांक मंगळवारीही नकारात्मक वाटचाल करत होता. सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य उंचावले; तर वाहन निर्देशांक वधारणेत आघाडीवर होता.

१०० लाख कोटींना पुन्हा गवसणी!
ल्ल आघाडीच्या मुंबई शेअर बाजाराने बुधवारच्या सत्रात पुन्हा एकदा १०० लाख कोटी रुपयांच्या एकूण बाजार संपत्तीला गवसणी घातली. सेन्सेक्स शुक्रवारी ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला असताना बाजाराने ही किमया साधली होती. मात्र गेल्या सलग दोन व्यवहारांमुळे तो या टप्प्यापासून दुरावला होता. बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० लाख कोटी रुपयांच्या पुढे १००,४०,४०८ कोटी रुपये उलाढालीपर्यंत पोहोचला. दिवसअखेरच्या किरकोळ घसरणीने मात्र त्याला १०० लाख कोटींपासून मागे नेले. बुधवारच्या सत्रसंपुष्टात बाजार भांडवल ९९.६३ लाख कोटी रुपये नोंदले गेले. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजारात २०० हून अधिक समभागांना त्यांचे वर्षांतील सर्वोच्च मूल्य प्राप्त झाले.